नाशिक जिल्ह्यात आठवड्याभरात ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

31

दोन महिला शेतकऱ्यांसह सहा शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक

रविवारच्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने उभ्या पिकांवर नांगर फिरविल्याने सटाणा तालुक्यात दोन तरूण शेतकऱ्यांनी जीवन संपविले, तसेच आठवडाभरात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून निफाड तालुक्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यात दोन महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. आठवडाभरातील या सहा घटनांनी नाशिक जिल्हा हादरला आहे.

सटाणा तालुक्यातील कंधाणे गावी राहत्या घरी नितीन कडू बिरारी (२५) यांनी सोमवारी, एक मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, ते सुरत येथे कंपनीत काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे ४० आर शेतजमीन असून, कंधाणे विविध कार्यकारी सोसायटीचे ५२ हजारांचे कर्ज घेतलेले आहे. याप्रकरणी एकनाथ नारायण बिरारी यांनी दिलेल्या माहितीवरून सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याच तालुक्यातील करंजाड येथील सुनील शांताराम देवरे (२७) यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी विष प्राशन करून जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे भुयाणे शिवारात एक हेक्टर १६ आर, तर करंजाडला ५४ आर शेतजमीन आहे. त्यांच्यावर करंजाड सोसायटीचे सुमारे दीड लाखांचे कर्ज आहे. रविवारच्या अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्याने या दोन्ही शेतकNयांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

निफाड तालुक्यात चार आत्महत्या झाल्या. करंजगाव येथील अनिता अंबादास चव्हाण (४३) यांनी २७ एप्रिलला विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली, त्यांच्या नावे शेतगट क्रमांक ५३१, ५५३ व ४८१ मध्ये शेतजमीन आहे. याप्रकरणी पोलीस पाटील रामेश्वर राजोळे यांनी दिलेल्या माहितीवरून सायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गाजरवाडीतील अश्विनी संदीप गाजरे (३२) यांनी धारणगाव वीर येथे वडिलांच्या घरी २६ एप्रिलला वीष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पतीच्या नावे शेती असल्याचे समजते.

उगाव येथील शंकर सखाराम जगताप (५२) यांनी सोमवारी, १ मे रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. पिंपळगाव-बसवंत गावातील सागर सुदाम जाधव (३०) यांनी आज सकाळी दहा वाजता टोलनाक्याजवळील कादवा नदीपात्रात उडी घेतली. हे लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाचविण्यात अपयश आले. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे, मात्र त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या