लस घेतल्याने खरोखर माणूस ‘मॅग्नेटो’ होतो का? वैज्ञानिक तथ्यासाठी ही बातमी नक्की वाचा

कोरोना लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा दावा नाशिकच्या सिडको परिसरातील अरविंद सोनार यांनी केला आहे. सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोना लसीबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा असताना, एका ज्येष्ठ नागरिकाने लस घेतल्यानंतर त्यांच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा आगळा वेगळा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र आता हा चुंबकत्वाचा दावा खोटा असल्याचं सांगत, याचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत याबाबतच सत्य सांगितलं आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अंनिस कार्यकर्ते अण्णा कडलासकर हे ही आपल्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिटकून दाखवत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दाभोलकर यांनी लिहिलं आहे की, “सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरे तर हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते हमखास!”

आपली प्रतिक्रिया द्या