‘रेस अराऊंड ऑस्ट्रिया’मध्ये भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांचे यश

सामना प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या सायकलपटूंनी जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याचा जणू धडाकाच लावला असून, लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी ‘रेस अराऊंड ऑस्ट्रिया’ ही युरोपातील सर्वात अवघड स्पर्धा पूर्ण करत विक्रम केला. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले हिंदुस्थानी असून, ते आता ‘रॅम’ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. केवळ आठ महिन्यांच्या प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळविले आहे.

लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये एरोनॉटीकल इंजिनिअर आहेत. सुपर रॅन्डोनर सायकलीस्ट असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून, नोकरी निमित्ताने बंगळुरू येथे असतात. या दोघांच्या ‘टीम इन्स्पायर इंडिया’ने जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्टशी स्पर्धा करीत २२०० किलोमीटरची शर्यत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना ‘टीम इन्स्पायर इंडिया’ने केवळ १०० तासात अंतर गाठले.

सहा महिन्याच्या अत्यंत कमी कालावधीत चैतन्य वेल्हाळ यांनी या टीम इन्स्पायर इंडियाला प्रशिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारले होते. वेल्हाळ हे सर्वात वेगवान हिंदुस्थानी अल्ट्रा सायकलस्वार आणि पहिले प्रमाणित आयर्नमॅन प्रशिक्षक आहेत, त्यांनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी आवश्यक असलेला सर्व प्रकारचा सराव दोघांकडून करून घेतला. वैज्ञानिक तंत्र वापरून त्यावर आधारित सराव वर्ग घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले होते.

अशी आहे स्पर्धा
रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड स्पर्धा आहे. ऑस्ट्रियाच्या सिमेजवळून जाणाऱया रस्त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. हा समुद्रसपाटीपासून जास्तीत जास्त १७ हजार ५०० फूट चढ-उतार असलेला रस्ता असून, ग्रॉसग्लॉकनेरसारख्या उंच ठिकाणाचाही यात समावेश आहे. निर्धारित रस्त्यावर वाहतूक सुरु असते, त्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आव्हानात्मक बनते. ही स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक ‘रॅम’ स्पर्धेसाठी पात्र ठरतो.

आपली प्रतिक्रिया द्या