
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष सत्यजित तांबे यांच्यासाठी सोपी व एकतर्फी करण्याचे भाजपाचे दबावतंत्र फोल ठरले आहे. तांबे व महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. सहाजणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 16 उमेदवार आहेत.
नाशिक पदवीधर मतदार संघात 29 पैकी सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोमवारपर्यंत एकूण सहाजणांनी माघार घेतल्याने सोळा उमेदवार रिंगणात आहेत. अमोल खाडे, डॉ. सुधीर तांबे, राजेंद्र दौलत निकम, दादासाहेब पवार, तसेच भाजपचे धनंजय जाधव, धनराज विसपुते यांचा माघार घेणाऱ्यांत समावेश आहे.
निवडणूक एकतर्फी होवून अपक्ष सत्यजित तांबे यांना सोपी व्हावी, यासाठी भाजपा नेते, मंत्री गिरीष महाजन यांनी पडद्याआडून सूत्रे हलविली. दबावतंत्राचा वापर करीत विशेष परिश्रम घेतले. पण, त्यांना अपयश आले. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या माघारीसाठीही विरोधकांकडून प्रयत्न झाले. माघारीची वेळ संपेपर्यंत त्या नॉट रिचेबल होत्या. माघारीची वेळ संपल्यानंतर शुभांगी पाटील या महसूल आयुक्त कार्यालयात हजर झाल्या. त्या म्हणाल्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मी आशीर्वाद घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी संपर्क करून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. महाविकास आघाडी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून मी यशस्वी होईल. मतदारराजा धनशक्तीला झुगारून जनशक्तीचा विजय करील, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.
मी नॉट रिचेबल का, वेळेवर समजेलच
आपल्या माघारीसाठी धमकी होती का? दबाव आला होता का? माघारीसाठी प्रयत्न झाले होते का? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना त्या म्हणाल्या की, नॉट रिचेबल होते, यावरून समजून घ्या, काहीतरी असल्याशिवाय मी नॉट रिचेबल नव्हते. वेळेवर समजेलच.