मुघलांना खलनायक बनवण्याची गरज नाही! नसिरुद्दीन शाह यांनी उपसली वादाची तलवार

पाकिस्तानात जाऊन त्यांनाच दहशतवादावरून सुनावल्यामुळे लेखक-गीतकार जावेद अख्तर यांचे सर्वत्रकौतुक होत आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी मुघल साम्राज्याचे कौतुक  करत वादाची तलवार उपसली आहे. ‘मुघलांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघल साम्राज्य इतके राक्षसी, विध्वंसक होते तर त्यांना विरोध करणारे लोक त्यांनी बांधलेली स्मारके पाडत का नाहीत,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  नसीरुद्दीन शाह यांनी ‘ताज-डिव्हायडेड बाय ब्लड’ या आगामी वेबसीरिजच्या यानिमित्ताने एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत मुघलांना विनाशकारी म्हटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नसीरुद्दीन शाह म्हणाले, ‘मला आश्चर्य वाटतेय की, काही लोक अकबर आणि नादिरशाह किंवा बाबरचा पणजोबा तैमूरसारख्या आक्रमक मुघल बादशाहमधला फरक सांगू शकत नाहीत, पण मुघलांबद्दल विचित्र दावे करत आहेत. हे लोक इथे लुटायला आले होते असे म्हणतात. मुघल मात्र इथे काहीही लुटायला आले नव्हते. ते या देशाला आपले घर बनवण्यासाठी आले होते आणि त्यांनी तेच केले. त्यामुळे त्यांचे योगदान कुणीही नाकारू शकणार नाही.’ पुढे ते म्हणाले, ‘जे लोक हे बोलत आहेत की मुघलांचा गौरव आपल्या स्वदेशी परंपरांच्या हिमतीवर झाला. कदाचित ते खरे असेल, परंतु त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. मुघलांबद्दल गौरवोद्गार काढायचे नसतील तर त्यांची बदनामी करण्याचीही गरज नाही,’ असे मत शाह यांनी मांडले.

मुघलांनी देशाचे नुकसान केले असे वाटत असेल तर ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार पाडून टाका!  नसिरुद्दीन शाह, अभिनेते