नथीचा नखरा चॅलेंज काय भानगड आहे? नथ घातलेले फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

सोशल मीडियावर यापूर्वी एकमेकांना अनेक चॅलेंज देताना नागरिकांना पाहिलं आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या महिलांमध्ये एक अनोखी चॅलेंज स्पर्धा सुरू आहे. स्वतः नथ घातलेला फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून महिला आपल्या मैत्रिणी किंवा नात्यातल्या महिलांना ‘नथीचा नखरा’ हे चॅलेंज देताना दिसत आहेत.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनची मुदत वाढवून ती 31मे करण्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घराच्या बाहेर पडताना घाबरत आहेत. तर लॉकडाऊन लागू असल्यामुळे शाळा-महाविद्यालय, खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये बंद आहेत. त्यामुळे नागरिक घरात अडकून पडले आहेत. वेळ घालवण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे खेळ खेळताना दिसत आहेत. त्यात महिला वर्गाकडून एका नव्या चॅलेंजची भर टाकण्यात आली आहे. लग्नसमारंभ किंवा एखाद्या सणावाराला नथ घालून काढलेले फोटो महिला व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत असून त्यांना ज्या मैत्रिणीला किंवा नात्यातल्या महिलेला चॅलेंज द्यायचा आहे त्याचं नाव स्टेटसला ठेवून ‘नथीचा नखरा’ चॅलेंज देण्यात येत आहे. ज्या महिलांना हे चॅलेंज देण्यात आलं आहे त्या महिला देखील नथ घातलेला आपला फोटो स्टेटसला ठेवून हे चॅलेंज स्वीकारत आहेत. त्यानंतर पुढे दुसर्‍या महिलांना ते चॅलेंज त्या देताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे चॅलेंज देण्याचे प्रमाण वाढले असून महिलांमध्ये या चॅलेंजजी क्रेझ निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या