पं. नाथराव नेरळकर

प्रशांत गौतम

मराठवाडय़ातील ज्येष्ठ गायक तथा संगीतकार पं. नाथराव नेरळकरांना ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा पुरस्कार घोषित झाला आहे. 11 मे रोजी डोंबिवलीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. नाथरावांनी मराठवाडय़ात तब्बल सहा दशकांहून अधिक काळ संगीत साधना केली. आपल्या अवीट स्वरांनी मराठवाडय़ाचे संगीत क्षेत्र समृद्ध केले. मराठवाडय़ाच्या अस्सल मातीतील हे कलंदर व्यक्तिमत्त्व आपल्या संगीत शिक्षण आणि प्रसारात सक्रिय आहे. वयाच्या ८१व्या वर्षीही नाथरावांच्या मैफली दमदारपणे रंगतात. अत्यंत मितभाषी स्वभाव ही जमेची बाजू असल्याने जसा शिष्य परिवार वाढला तसा हितचिंतक, चाहते मित्र परिवारही वाढला. २०१५ या वर्षी नाथरावांना संगीत नाटक अकादमीची सन्मानाची फेलोशिप प्राप्त झाली. देशाच्या राजधानीत नाथरावांचा सन्मान झाला. असा सन्मान प्राप्त करणारे नाथराव हे मराठवाडय़ातील पहिलेच कलावंत होय. या आणि नुकत्याच जाहीर झालेल्या चतुरंग प्रतिष्ठानच्या पुरस्काराच्या सन्मानामुळे मराठवाडय़ाचे संगीतक्षेत्र सशक्त आणि समृद्ध झाले. याचा त्यांच्या शिष्यांना जसा आनंद आणि अभिमान वाटतो तसाच त्यांच्या मित्रपरिवार आणि हितचिंतक, श्रोत्यांनाही वाटतो. नाथरावांचे जन्मगाव नांदेड. संगीत कला आणि कलाकारांना समाजात मान, प्रतिष्ठा नव्हती अशा काळात गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे नाथरावांनी संगीत शिक्षणाचे धडे घेतले आणि संगीत शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. नाथरावांनी अनेक होतकरू, गरीब विद्यार्थी शोधले. त्यांना गुरुकुलमध्ये स्वखर्चाने शिक्षण दिले. या गुरुकुलामधून जागतिक कीर्तीचे कलावंत घडले. विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे काही एका रात्रीत मिळाले नाही. अर्थात त्यामागे सहा दशकांची कठोर संगीत साधना होती. गांधर्व मंडळाच्या मध्यमा, संगीत विशारद तसेच अलंकार परीक्षेत एकाच वर्षात नाथरावांच्या तीन विद्यार्थिनींनी देशात अव्वल गुणांनी प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. गुंजकरांनी लावलेल्या या रोपटय़ाचा विस्तार झाला. नांदेडच्या प्रतिभा निकेतनमध्ये नाथराव संगीत शिक्षक. असले तरी त्यांचा रुबाब मात्र हेडमास्तरासारखा राहिला. संगीत मैफलींच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंत नांदेडला येत आणि मितभाषी नाथरावांच्या प्रेमात पडत. या मितभाषी स्वभावामुळे, साहित्य व संगीत क्षेत्रातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ना. पेंडसे, प्राचार्य राम शेवाळकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, संगीतकार यशवंत देव, हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, पं. जसराज, बकुळ पंडित, सुरेश वाडकर, झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांशी स्नेह आणि जिव्हाळा निर्माण झाला. नांदेडच्या वास्तव्यात नाथराव संगीत विशारद परीक्षेत देशभरात प्रथम आले आणि त्यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सुवर्णपदकाने सन्मान झाला. प्रतिभा निकेतनमध्ये तेरा वर्षे संगीत शिक्षक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कोलकाता येथील रिसर्च अकादमीचे गुरुपद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुखपद भूषविले. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, उज्जैन येथील कालिदास संगीत महोत्सव, संभाजीनगरातील वेरुळ महोत्सव, नामधारी संगीत महोत्सवाच्या मैफली नाथरावांनी गाजवल्या. पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज या दोघांशी नाथरावांचा खूप जिव्हाळा. नांदेड सेडून संभाजीनगरला स्थायिक व्हावे असा या दोन दिग्गजांचा नाथरावांना प्रेमळ सल्ला होता. हो-नाही करीत तो नाथरावांनी मानला. ५ जुलै १९७३ रोजी प्रतिभा निकेतनमधील संगीत शिक्षकाची नोकरी सोडली आणि संभाजीनगरात गोविंदभाईंनी त्यांना आपल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सामील करून घेतले. नांदेडच्या कृष्णनाथांचा म्हणजेच नाथरावांचा हा बहुआयामी प्रवास. या प्रवासाचा संगीत क्षेत्रातील लक्षवेधी योगदानाचा ‘चतुरंग’ पुरस्काराने गौरव झाला आहे. नाथरावांची मैफल मग ती संगीताची असो की गप्पांची. ती सदैव बहरलेलीच असते.