फुले दाम्पत्य, सावकरांसह नथुराम गोडसेलाही ‘भारतरत्न’ देता का? काँग्रेसचा उद्विग्न सवाल

1017

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे भाजपाने संकल्पपत्रात जाहीर केले आहे. त्यापेक्षा नथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा उद्विग्न सवाल काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला.

महात्मा गांधींच्या हत्त्येच्या कटात सहभागी असल्याचा सावरकरांवर आरोप होता. गांधी हत्त्येतील ते एक संशयीत आरोपी होते. पण, गोडसेने थेट गांधींना संपवलेच. हे महात्मा गांधींचे दीडशेवी जयंती वर्ष आहे. गोडसेला भारतरत्न देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ सापडणार नाही. तेव्हा भाजपा सरकारने गोडसेलाच भारतरत्न देऊन टाकावे, असे तिवारी म्हणाले.

मोदींचे सरकार दहा वर्ष राहील…
2004 मध्ये काँग्रेसला 182 जागा मिळाल्या तर 2009 मध्ये 206 जागा आल्या. मात्र 2014 मध्ये लोकांनी आम्हाला घरी बसवले. आमच्या फक्त 44 जागा आल्या. एका ठराविक कालावधीनंतर लोक प्रत्येकालाच थांबायला सांगतात. हा काँग्रेससाठी नक्कीच आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनाचा विषय आहे. आमच्या प्रमाणेच मोदींचे सरकारही दहा वर्षे राहील. नंतर आम्ही परत निवडून येऊ असा आशावाद तिवारी यांनी व्यक्त केला. यूपीए सरकारच्या काळातही 2008 मध्ये आर्थिक मंदी, 2011 मध्ये युरो झोन क्रायसिस आणि 2007 ते 2014 या कालावधीत कच्च्या तेलाच्या बेसुमार वाढलेल्या किमती अशी संकटे आली. पण, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक परिस्थिती कुशलतेने हाताळून देशाला मंदीच्या खाईतून बाहेर काढले.

manish-tiwar

आमच्या काळात तेलाच्या एका बॅरेलचा दर 105 ते 106 रूपये डॉलर इतका होता. आता तो 40 ते 45 रूपये डॉलर इतका आहे. तरीही देश आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडला आहे. आमच्या काळाशी तुलना करता आजच्या इतकी वाईट परिस्थिती कधीच नव्हती, असा टोला तिवारी यांनी हाणला. काँग्रेसमध्ये नेतृत्व लकवा कधीच नव्हता. निवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी याच सक्षम नेत्या होत्या, अशी सारवासारव तिवारी यांनी केली. देशाला आर्थिक दिवाळखोरीच्या खाईत लोटल्यानंतर भाजपावाले राष्ट्रवादाच्या गोष्टी करीत आहेत. पण, राष्ट्रवादाने पोट भरत नाही, अशी टीका तिवारी यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या