Video – नथुराम गोडसे महान हिंदू होता! काँग्रेसच्या नेत्याचे विधान

नथुराम गोडसे हा महान हिंदू होता मात्र त्याने महात्मा गांधी यांची हत्या केली! असं विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. आचार्य प्रमोद कृष्णन असं या नेत्याचे नाव आहे. एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या वादविवाद कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर वृत्तनिवेदकाने आचार्य कृष्णन यांना म्हटले की त्यांचे हे विधान राहुल गांधी यांनी ऐकले तर ते त्यांना पक्षातून काढून टाकतील.

कृष्णन यांनी या कार्यक्रमात म्हटले की गोडसेला हिंदू धर्मापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. यावर वृत्तनिवेदकाना त्यांना थांबवत म्हटले की तुम्ही गोडसे याला फक्त हिंदू नाही तर महान हिंदू असल्याचे म्हटले आहे. यावर कृष्णन म्हणाले की जर तुम्ही म्हटला असता की गोडसे हिंदू नव्हता तर मी तुमच्या या विधानाशी सहमत नाही. जर कोणी दहशतवादी हा हिंदू असेल तर त्याला हिंदूच म्हटले जाईल.

कृष्णन यांच्या या विधानाबाबत बोलताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया म्हणाले की राहुल गांधी हे ढोंगी आणि इच्छाधारी हिंदू आहेत. यावर कृष्णन त्यांना म्हणाले की तुमची प्रत्येक गोष्ट राहुल गांधींपासून सुरू होते आणि राहुल गांधींवरच येऊन संपते. यावर भाटीया यांनी कृष्णन यांना म्हटले की तुमच्या मते पहिले हिंदू उदारमतवादी होते, मात्र आता ते सांप्रदायिक झाले आहेत, हीच काँग्रेसची विचारधारा आहे.

या व्हिडीओवर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. पियूष सिंह नावाच्या ट्विटर वापरणाऱ्याने म्हटले आहे की ‘हे सगळे मिळून काँग्रेस संपवणार आहेत’. शुभम तिवारी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना टॅग करत म्हटलंय की ‘तुमचे नेते काहीही बरळतायत.’ गुड्डू मिश्रा नावाच्या व्यक्तीने म्हटलंय की ‘चुकीचं काय म्हटलंय, खरं आहे; देर आए दुरुस्त आए.’ जनसत्ता या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.