राष्ट्रीयीकृत बँका आणि रेल्वेतही मराठी भाषेचा लवकरच वापर – सुभाष देसाई

537

महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राधिकरणांत त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन अमित शहा यांनी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांना दिले आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँका, मध्य व पश्चिम रेल्वेसारख्या आस्थापनांमध्ये मराठी भाषेला मानाचे स्थान मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे. केंद्र सरकारने राजभाषा नियम 1967 चे धोरण अंगिकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारीतील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांना त्रिभाषा सूत्र लागू केलेले आहे, परंतु राष्ट्रीयीकृत बँका, पश्चिम व मध्य रेल्वे, टपाल आदी कार्यालयांत या सूत्राची अंमलबजावणी होत नसल्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी निदर्शनास आणून दिले होते. सुभाष देसाई यांनी 6 फेब्रुवारीला अमित शहा यांना पत्र पाठवून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याबाबत विनंती केली होती.

या पत्राला अमित शहा यांनी 20 फेब्रुवारीला उत्तर दिले. केंद्राच्या अखत्यारीतील प्राधिकरणांत त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी होते किंवा नाही याची संबंधितांकडून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी कळविले आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीयीकृत बँका, पश्चिम व मध्य रेल्वे यामध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्य शासनाकडे दाखल झालेल्या असून केंद्राने यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने केंद्रीय कार्यालयांत मराठीचा वापर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या