‘कंडोम’वरील विधानाने महिला अधिकारी अडचणीत, महिला आयोगाचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश

विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना वाद ओढवून घेतलेल्या बिहारच्या सनदी अधिकारी हरजोत कौर भामरा अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या विधानावर राष्ट्रीय महिला आयोगाने स्पष्टीकरण मागितलं आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे मुलींच्या जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात मुलींनी सहभाग नोंदवला होता. कार्यशाळेत एका मुलीच्या प्रश्नाला एका वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून सगळेच अवाक् झाले. सरकारला मत द्यायचं नसेल तर देऊ नका, पाकिस्तानात जा, असा अजब सल्लाही त्यांनी दिला. यावरून त्यांच्यावर सडकून टीका झाली.

मुलीने विचारले की सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने सांगितले की, या मागणीचा अंत आहे का? त्या पुढे म्हणाल्या की तुम्ही 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकता. तुम्ही उद्या जीन्स-पँट देऊ शकता, परवा शूज का देऊ शकत नाही? आयएएस अधिकारी हरजोत कौर पुढे म्हणाल्या की जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा निरोध देखील विनामूल्य द्यावा लागेल.

या विधानावरून आता भामरा अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. महिला आयोगाने त्यांना विद्यार्थिनीसमोर केलेल्या विधानाविषयी स्पष्टीकरण मागितलं आहे. पुढील सात दिवसात आपलं उत्तर सादर करण्याचे आदेशही महिला आयोगाने दिले आहेत.