दर तासाला देशात 28 जण मृत्यूला गाठतात…

414

2018 मध्ये देशात दर तासाला 28 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून वर्षभरात 10 हजार 159 जणांनी मृत्यूला कवटाळले आहे. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आत्महत्या या 2018 या वर्षात झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करणाऱया विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त असून राज्यातील 1 हजार 448 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

बदललेली शिक्षणपद्धती, शिक्षणातील अपयश, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, प्रवेशातील शर्यतीची भीती आणि बेरोजगारीमुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमालीचा वाढला आहे. वारंवार अपयश पदरी पडल्यामुळे निराश झालेले विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्युरो’ने 2018 मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जारी केली आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत देशात तब्बल 81 हजार 758 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी 57 टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या पाच वर्षांत आपले जीवन संपविले.

आत्महत्या करणाऱया विद्यार्थ्यांपैकी एकचतुर्थांश विद्यार्थ्यांनी परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. समाजशास्त्र्ाज्ञांच्या मते डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, कौटुंबिक समस्या, इतर नातेसंबंध यामुळे विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. सध्या आपण सामाजिक कमी पण व्यक्तिवाद बनत चाललो आहोत. संवाद हरविल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे मत व्यक्त होत आहे.

बेरोजगारीमुळे 1 हजार 260 आत्महत्या

2018 मध्ये देशात एकूण 1 लाख 34 हजार 516 जणांनी आत्महत्या केल्या. यातील 8 टक्के विद्यार्थी होते. तर 10 टक्के लोकांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. यात 10 हजार 687 पुरुष तर 2 हजार 249 महिलांचा समावेश आहे. बेरोजगारीमुळे सर्वाधिक 1 हजार 585 आत्महत्या केरळमध्ये झाल्या असून तामीळनाडू आणि महाराष्ट्रातील अनुक्रमे 1 हजार 579 आणि 1 हजार 260 बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत.

2018 मधील आत्महत्या

 • 1,707 सरकारी कर्मचारी
 • 8,246 खासगी कर्मचारी
 • 2,022 सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
 • 10,159 विद्यार्थी
 • 13,149 व्यावसायिक
 • 5,763 शेतकरी.

राज्यनिहाय आत्महत्याग्रस्त विद्यार्थी

 • महाराष्ट्र 1448
 • तामीळनाड 953
 • मध्य प्रदेश 862
 • कर्नाटक 755
 • पश्चिम बंगाल 609
आपली प्रतिक्रिया द्या