सरकारने कोणत्याही खेळाला राष्ट्रीय दर्जा दिलेला नाही, केंद्रीय मंत्रालयाचे माहितीच्या अर्जावर उत्तर

507
साभार-हॉकी इंडिया

हॉकी हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय खेळ आहे असे प्रत्येक हिंदुस्थानी ठामपणे सांगतो. क्रीडाविश्वातही हाच कित्ता गिरवला जातो. पण प्रत्यक्षात असे नाही आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून हिंदुस्थानात कोणत्याही खेळाला राष्ट्रीय दर्जा दिला गेलेला नाही अशी माहिती केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाकडून यावेळी देण्यात आली आहे. धुळे जिह्यातील शाळेमध्ये शिक्षक असलेल्या मयूरेश अग्रवालने माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. यावर केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने उत्तर दिले आहे.

मयूरेश अग्रवाल हे सिंदखेडा तालुक्यातील व्ही. के. पाटील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हिंदुस्थानात हॉकी या खेळाला केव्हा राष्ट्रीय दर्जा दिला गेला असा प्रश्न एका विद्यार्थ्याने त्यांना केला असता त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली याबाबत केंद्रीय मंत्रालयाला विचारले. सरकारकडून कोणत्याही एका खेळाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला नाही. इतर प्रमुख खेळांचा विकास व्हावा, त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या