मेट्रोच्या नदीपात्रातील कामाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती

32

पुढील सुनावणी २५ जानेवारीला

पुणे – महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन कंपनी स्थापन होईपर्यंत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही काम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) अंतरिम स्थगिती दिली आहे. यावरील आगामी सुनावणी येत्या २५ जानेवारीला होणार आहे. मात्र, मेट्रोसाठी सुरू असलेल्या अन्य कोणत्याही सर्वेक्षणावर निर्बंध नसल्याचे त्यात स्पष्ट केले आहे. दरम्यान, यावरून गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलेल्या मेट्रोचे शुक्लकाष्ट न संपण्याची चिन्हे आहेत.

शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचा समावेश आहे. त्यातील वनाज ते रामवाडी या मार्गामध्ये बदल करण्यात आला असून, हा मार्ग जंगली महाराज रस्ता, संचेती चौक, सिव्हिल कोर्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे पुणे स्टेशनला जाण्याऐवजी खंडुजीबाबा चौकातून नदीपात्रामार्गे पालिका भवन, शासकीय धान्य गोदाम, संगम पूलमार्गे पुणे स्टेशनपर्यंत जाणार आहे. त्यातील खंडुजीबाबा चौक ते न्यायालयातपर्यंत पावणेदोन किलोमीटरच्या मार्गाला स्थगिती द्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एनजीटीकडे केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. पुण्यात मेट्रोच्या अंमबलजावणीची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे असल्याचे त्यांनाही प्रतिवादी केले जावे, अशी मागणी काण्यात आली. या कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तोपर्यंत नदीपात्रातील मेट्रोशी निगडित काम थांबवावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले. एनजीटीने मेट्रो नदीपात्रातील बांधकामांवर निर्बंध लादले आहेत. मेट्रोसाठी सुरू असलेल्या अन्य कोणत्याही सर्वेक्षणावर आडकाठी नसेल असे त्यात स्पष्ट केले आहे. कंपनीच्या नोंदणीनंतर त्यांना यामध्ये अधिकृतरीत्या प्रतिवादी करावे. त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. यावरील सुनावणी येत्या २५ जानेवारीला होणार आहे, असे याचिकाकर्ते सारंग यादवडकर आणि अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.

कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील
मेट्रोच्या नियोजनाशी संबंधित कामावर एनजीटीने कोणतेही बंधन घातलेले नाही. केवळ नदीपात्रातून जाणार्‍या प्रस्तावित मेट्रोच्या मार्गापुरते हे आदेश मर्यादित आहेत. मेट्रो मार्गाचे नियोजन, त्याची रचना-आरेखन किंंवा इतर भागांत सुरू असणारे मृद सर्वेक्षण ही कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या