रेल्वे सुसाट! सलग तिसऱयांदा पटकावले राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद

भारतीय रेल्वेने सेनादलाला 44-23 असे सहज पराभूत करीत वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली. सेनादलालाही सलग तिसऱयांदा पराभूत व्हावे लागले. भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील रोहा-रायगड, राजस्थानातील जयपूर व आता अयोध्या उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्राच्या कबड्डी संघाला मात्र उपांत्य फेरीतच बाद व्हावे लागले.

जेतेपदाच्या लढतीत मध्यंतराला 19-10 अशी रेल्वेकडे आघाडी होती. तशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात रेल्वेचा पवनकुमार विरुद्ध सेनादलाचा नवीन कुमार यांच्यातच लढत झाली. निरस झालेल्या या एकतर्फी सामन्यात खऱया अर्थाने आजचा दिवस गाजविला तो महाराष्ट्राने.

कडव्या प्रतिकारानंतर महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरीत सेनादलाकडून 38-40 अशी दोन गुणांनी हार पत्करावी लागल्याने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्र या सामन्यात हरला जरी असला तरी प्रशिक्षक प्रशांत सुर्वे व कर्णधार शुभम शिंदेच्या या संघाने महाराष्ट्रातील तमाम कबड्डी रसिकांची मने जिंकली.

अयोध्या-उत्तर प्रदेश येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेनादलाने पहिल्यापासून वर्चस्व ठेवले होते. पूर्वार्धात महाराष्ट्रावर पहिला लोण देत मध्यंतराला 22-17 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर महाराष्ट्राचा संघ एका वेगळ्या इराद्याने मैदानात उतरला. सिद्धार्थ देसाई, पंकज मोहिते, रिशांक देवाडिगा यांनी चढाईत गुण घेत, तर मयूर कदम, गिरीश इरनाक, शुभम शिंदे यांनी उत्कृष्ट पकडी करीत सेनादलावर लोण देत गुणातील फरक कमी केला. शेवटची काही मिनिटे सेनादल फक्त 1 गुणांच्या आघाडीवर खेळत होता. या पूर्वार्धातील डावात आपल्या तीन चढाईच्या खेळाडूंच्या अव्वल पकड झाल्या. आपणदेखील एक अव्वल पकड केली. पकडीतील या 2 गुणांचा फरकाने महाराष्ट्राला पराभवाच्या गर्तेत लोटले. शेवटच्या मिनिटात सिद्धार्थ देसाईची पकड करीत सेनादलाने हा सामना 2 गुणाने जिंकला. या चढाईत सिद्धार्थ देसाईला जर गुण मिळाला असता तर सामना पुन्हा एकदा बरोबरीत सुटला असता. आज महाराष्ट्राचा दिवस नव्हता.

दुसऱया उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेने मध्यांतरातील 14- 16 अशा 2 गुणांच्या पिछाडीवरून राजस्थानचे आव्हान 45-30 असे परतवून लावत अंतिम फेरीत धडक दिली. पूर्वार्धात पहिला लोण देत राजस्थानने आघाडी घेतली होती, पण उत्तरार्धात ती त्यांना टिकवता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या