
क्षुल्लक वादातून कर्मचाऱ्याने सहकाऱ्यालाच संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ऑफिसमधील लाईट बंद करण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याची डंबलने मारहाण करत हत्या केली. भीमेश बाबू असे हत्या झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बंगळुरूतील गोविंदराजनगर स्थित डाटा डिजिटल बँकेच्या ऑफिसमध्ये शनिवारी रात्री 10.30 वाजता ही घटना घडली. ही कंपनी फिल्म शूटिंगचे व्हिडिओ स्टोअर करते. शनिवारी आरोपी सोमला वामशी आणि भीमेश बाबू दोघे ऑफिसमध्ये होते. यावेळी भीमेशला लाईट त्रास होत असल्याने तो सोमला याला लाईट बंद करण्यास सांगत होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
पाहता पाहता वाद विकोपाला गेला. यानंतर सोमला याने रागाच्या भरात भीमेशच्या डोक्यात डंबल मारहाण केली. यात भीमेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी सोमला पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांच्या स्वाधीन झाला. पोलिसांनी सोमला विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.


























































