दिलासा!  कर्करोगावरील नऊ औषधांच्या किमती 90 टक्क्यांनी घटल्या

सामना ऑनलाईन । चेन्नई

कॅन्सरच्या उपचारादरम्यान रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथोरिटीने घेतला आहे. कॅन्सरवरील नऊ औषधांच्या किमती तब्बल 90 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. यामध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील केमोथेरपी इंजेक्शनचाही समावेश आहे. त्यांच्या किमती 87 टक्के कमी झाल्या आहेत.

नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथोरिटी ही केंद्र सरकारच्या रसायन आणि खते या खात्याअंतर्गत काम करणारी स्वतंत्र यंत्रणार आहे. या यंत्रणेने मार्च महिन्यांत ऍण्टी कॅन्सर औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा औषधांच्या किमती घटवल्या आहेत. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी लागणाऱया इंजेक्शन pemetrexed 500 mg (ब्रँड नाव pemxcel अंतर्गत विकले जाते) किंमत 22 हजार रुपयांवरून 2,800 रुपये एवढी करण्यात आली आहे. याच इंजेक्शनचा 100 एमजी डोसची किंमत 7700 वरून रुपये 800 एवढी कमी झाली आहे.

किमो औषध epirubisin (ब्रॅड नाव epichlor ) च्या इंजेक्शनचा एक 10 एमजीचा डोस 276 रुपये होईल. सध्या हा डोस 561 रुपये किमतीला मिळायचा. 50 एमजीच्या इंजेक्शनची किंमत 2662 रुपयांवरून 960 रुपये इतकी कमी झाली  आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथोरिटीने घेतलेल्या निर्णयानुसार, 390 ब्रॅण्डस्च्या किमती कमी झाल्या आहेत.

22 लाख रुग्णांना लाभ

2018 या वर्षात 8 लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. 2040 पर्यंत कर्करोगग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणांवर वाढणाऱया कर्करोगावरील उपचार मात्र फार खर्चिक आहेत. औषधांच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील 22 लाख कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.