
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी राखून दारुण पराभव केला आहे. त्यामुळे विश्वचषकावर नाव कोरण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख, रणवीर यांच्यासह बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि दीड लाख प्रेक्षक उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्डकप उंचावला. आता विश्वचषकाचे सामने संपले असले तरी हा अंतिम सामना पाहण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट झाले आहेत. त्यांच्याकडे मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही, पण क्रिकेट सामना पाहण्यासाठी वेळ आहे’, असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. हा सामना संपल्यानंतर जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी अहमदाबादमधील त्यांच्या नावाच्या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी वेळ काढला. उद्यापासून ते राजस्थान आणि तेलंगणात जाऊन काँग्रेसला शिव्या घालतील, पण तरीही त्यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, तिथे अजूनही तणाव आहे, असे रमेश म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीम इंडियाचे चांगला खेळ केल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, संपूर्ण विश्वचषकातील तुमच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले. ते म्हणाले की, टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली! जिंका किंवा हरा- आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करतो आणि आम्ही पुढील वर्ल्डकप जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.