देशाचे संविधान बदलण्याचे प्रयत्न अजूनही सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनमतामुळे भाजपच्या हा डाव उधळला गेला असला तरीही आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे देश आणि संविधान रक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी केले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशाने देश वाचविण्याचे काम केले. देश आणि संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन योगेंद्र यादव यांनी केले.
देशातील हुकूमशाही विरोधात व संविधान वाचविण्यासाठी राज्यातील 288 मतदारसंघापैकी 150 मतदार संघात भारत जोडो अभियान विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी महाविकास आघाडीच्या बाजुने उभे राहील. निवडणुकीतंर राज्यातील भाजप सरकार गेले तरी ही आमची लढाई पुढील 25 ते 30 वर्षे सुरू राहील. म्हणूनच ही लढाई सोपी नाही. ही लढाई आपण जिंकल्यास दुसरे प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊ शकेल, असेही योगेंद्र यादव म्हणाले. ईव्हीएमचा प्रश्न गंभीर आहे. या यंत्रणेबाबत साशंकता आहे. निवडणूक आयोगाला कणा नाही. ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. देशभरातील विरोधीपक्षांनी व्हीव्हीपॅट मतगणनेची मागणी केली आहे. त्यानुसार मतगणना व्हावी, असे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
राज्यघटना अस्तित्वात आल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचा स्वीकार केला नाही. तेव्हापासूनच हा प्रयत्न सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात राज्यघटनेची समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.राज्यघटनेची शपथ घेऊन ते घटना संपवित आहेत. घटना संपवायची मात्र, लोकांपुढे ते येऊ द्यायचे नाही असा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप यादव यांनी केला.
भाजप हा तोडफोड करणारा पक्ष आहे. जिथे जाते तिथे तोडफोड करतो. जातीच्या आधारावर लोकांना विभागण्याचे काम करीत आहे. हरियानात जाट विरुद्ध दलित असा संघर्ष निर्माण केला. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्येसुद्धा असाच प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे देश आणि संविधान वाचवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज यादव यांनी व्यक्त केली.