‘एअर स्ट्राईक’, ‘सर्जिकल स्ट्राईक’ मोठे यश! राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे नवनियुक्त स्पीकर ओम बिर्ला यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात मतदारांचे कौतुक केले. तसेच मोदी सरकारच्या 5 वर्षातील कामगिरीचा आलेखही लोकांसमोर मांडला. ‘एअर स्ट्राईक’, ‘सर्जिकल स्ट्राईक’ हिंदुस्थानचे मोठे यश असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. वाचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्त्वाचे मुद्दे

1. दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण जग हिंदुस्थानसोबत उभे आहे. देशातील दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले हे याचे ताजे उदाहरण आहे. पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईक करून हिंदुस्थानने आपली शक्ती आणि इरादे स्पष्ट केले आहेत.

2. ‘एक देश, एक निवडणूक’ या धोरणावर विरोधकांनी गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ ही वेळेची मागणी आहे. देशाचा विकास वेगाने होण्यासाठी आणि देशातील नागरिकांना लाभ होण्यासाठी हे आवश्यक आहे.

3. आमचे सरकार लष्कर आणि सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणावर वेगाने काम करत आहे. येणाऱ्या काळात हिंदुस्थानला राफेल लढावू विमान आणि अपाचे हेलिकॉप्टर मिळणार आहे, यामुळे लष्कराची ताकद वाढणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत आत्याधुनिक हत्यार बनवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

4. दिल्लीतील इंडिया गेटजवळ बनवण्यात आलेल्या ‘नॅशनल वॉर मेमोरियल’द्वारे आमच्या सरकारने शहिदांना विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे. देशाची सुरक्षा करताना शहीद झालेल्या पोलीस दलातील जवनांच्या स्मृतिंमध्ये सरकारने ‘नॅशनल पोलीस मेमोरियल’चे निर्माण केले आहे.

5. विदेशातील घुसखोर देशातील सुरक्षेला मोठा धोकादायक आहे. घुसखोरीची समस्या संपवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. घुसखोरीमुळे त्रस्त असणाऱ्या भागात ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स’ची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर राबवली जाईल.

6. ‘मिशन शक्ती’च्या यशस्वी प्रक्षेपणाद्वारा हिंदुस्थानने अंतराळातील तंत्रज्ञानामध्ये आपली क्षमता आणि देशाची सुरक्षा व्यवस्थेची तयारी दाखवून दिली आहे. तसेच संशोधक सध्या चंद्रयान-2 च्या प्रक्षेपणामध्ये गुंतले आहेत. चंद्रावर पोहोचणारे हे हिंदुस्थानचे पहिले अंतराळ यान असेल.

7. विदेशातील हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. आज विदेशात एखादा हिंदुस्थानी व्यक्ती संकटात असतो तेव्हा त्याला तात्काळ मदत मिळते. तसेच पासपोस्टपासून ते व्हिसापर्यंत अनेक सेवांची आधुनिकीकरण करण्यात आले आहे.

8. आगामी काळात नमानी गंगे योजनेअंतर्गत गंगा नदीत येणाऱ्या गटारींना बंद करण्याचे काम अधिक वेगाने केले जाईल. गंगा नदीप्रमाणे कावेरी, पेरियार, नर्मदा, यमुना, महानदी आणि गोदावरीसारख्या नद्या प्रदुषणमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

9. महामार्गांसह रेल्वे, एअरवे आणि इनलँड वॉटरवे क्षेत्रामध्ये सराकर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ‘भारतमाला’ योजनेअंतर्गत 2022 पर्यंत जवळपास 35 हजार किलोमीटरच्या महामार्गांचे निर्माण करण्यात येईल.

10. काळ्या पैशांविरोधातील मोहीम अधिक वेगावान करण्यात येईल. गेल्या 2 वर्षात 4 लाख 25 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना अयोग्य घोषित करण्यात आले, तर 3 लाख 50 हजार संशयित कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या