राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचा बोजवारा, पाच वर्षांनंतरही २० योजना अपूर्ण

49
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. एकूण २९५ योजनांपैकी ३१ योजनांच्या कामांना सुरुवात झाली नसून २० योजनांचे काम अपूर्ण आहे. कोटय़वधी रुपये खर्च होऊन या योजना अपूर्ण राहिल्यानंतर शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी प्रत्येक उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत २९५ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २४४ योजना पूर्ण झाल्या असल्या तरी ५१ योजना अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामध्ये अलिबाग तालुक्यात उमटे धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प, तिनविरा जलशुद्धीकरण प्रकल्प, रेवस ग्रामीण पाणी योजना, खंडाळा राष्ट्रीय पेयजल योजना, नेरळ येथील ममदापूर पाणी योजना या प्रमुख योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी एकूण १६ कोटींचा निधी प्राप्त झालेला असला तरी अद्यापपर्यंत १३ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

अपुऱ्या निधीमुळे कामे रखडली
जिल्ह्यातील सर्व पेयजल योजना मार्गी लावण्यासाठी ६० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र शासनाकडून फक्त एक किंवा दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या योजनांचे काम रखडले आहे, अशी चर्चा ग्रामीण पाणीपुरवठा विभागात आहे. या रखडलेल्या कामांबाबत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या वाट्याला पाण्यासाठी वणवण
जिल्ह्यातील शेकडो गावांमधील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या ५१ योजना अपूर्ण राहिल्याने यंदाच्या उन्हाळ्यात अनेक गावांमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबणार नाही. दरम्यान अपूर्ण योजना येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी प्रतिक्रिया रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या