राष्ट्रीय सुरक्षा आणि २४ तास ‘ऍलर्ट’!

41

जयेश राणे

विमान अपहरणाच्या प्रयत्नाविषयी हैदराबाद येथून अज्ञात महिलेचा ई-मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाल्यावर मुंबईसह देशातील तीन विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती. पण ही गोष्ट प्रेयसीने मुंबई आणि गोवा येथे फिरायला जाण्याचा विचार लांबणीवर टाकावा म्हणून करण्यात आलेला खोडसाळपणा असल्याचे उघड झाले. वैयक्तिक स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱया अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवून वठणीवर आणले पाहिजे. जेणेकरून पुन्हा असा खोडसाळपणा कोणी करणार नाही. अशा लोकांच्या अफवांचा फायदा अतिरेकी उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिरेक्यांनी देशभर आपले जाळे पसरवलेलेच आहे. हे माहीत नाही अशी एकही व्यक्ती देशात नाही. तरीही खोडसाळपणा करणे म्हणजे त्यास अक्षम्य अपराध का म्हणू नये? मुंब्य्रासह देशभरातून चार अतिरेक्यांना गेल्याच आठवडय़ात अटक करण्यात आली. शिवाय सहा संशयितही ताब्यात घेण्यात आले आहेत. यावरून देशात अतिरेक्यांनी आपली पाळेमुळे किती, कुठे रुजवली आहेत हे लक्षात येते. या हलाखीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांशी खेळ खेळणाऱयांत देशाविषयी पुसटशीही संवेदना नाही. हे लक्षात येते. सुरक्षेसाठी सैनिक अहोरात्र पहारा देत असतात. निसर्गाची साथ असो वा नसो त्यांना देशसेवेचे कर्तव्य चोख बजावायचे एवढेच त्यांना ज्ञात असते. सैनिकांसारखे खडतर जीवन काही दिवस सोडा, पण काही तासही जगण्याचा विचार अंग शहारून टाकते. अशा सैनिकांची चेष्टा करणारे कृतघ्नच म्हणता येतील. सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत म्हणून आपण दैनंदिन कामकाज तरी करत आहोत. देशावरील कठीण स्थितीत देशाला आपल्याकडून शक्य ती मदत करणे आवश्यक असते. किंबहुना ते प्रत्येक देशवासीयाने आपले कर्तव्यच समजले पाहिजे. देशाची सुरक्षा आणि सुरक्षा यंत्रणा यांना मदत करू पाहणारी माणसे हैदराबाद प्रकरणामुळे दुरावली जाऊ शकतात. तसेच जेव्हा खरोखरच अतिरेकी दुर्घटना घडवून आणण्यास सज्ज असतील तेव्हा त्या अनुषंगाने मिळालेल्या सूचनेचे गांभीर्य अल्प होऊ शकते.

देशातील मुख्य विमानतळे, रेल्वे स्थानके आणि महत्त्वाची सार्वजनिक स्थळे आदी वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षेविषयी कायमस्वरूपी सतर्क रहाणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून अपहरण वा आक्रमण होण्याची सूचना मिळाल्यावर त्या प्रसंगास तोंड देण्यास २४ तास सज्ज रहाता येईल. सूचना मिळाल्यावर सावधान आणि नंतर स्थिती सामान्य होत असल्याचे दृष्टीपथात आल्यावर काही दिवसांनी विश्राम, असा एक भाग अनुभवण्यास मिळतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय नागरिकांना सुरक्षितता कशी अनुभवता येईल?

‘२६/११’च्या वेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरील भीषण नरसंहाराने अवघा देश हादरला होता. विमान अपहरणाचाही झटका हिंदुस्थानने अनुभवलेला आहे आणि त्याची किंमत खतरनाक दहशतवाद्यांची सुटका करून चुकवावी लागलेली आहे. त्यामुळे पुन्हा अशी चूक देशास महागात पडू शकते. दुर्घटना घडल्यानंतर त्यावर शोक व्यक्त करून काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा अशा घटना होण्यास वावच मिळणार नाही, हे पाहिले जावे. आज अशी स्थिती आहे की अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्यावर सुरक्षा वाढवण्यासाठी ऐनवेळी धावपळ होत असते. येथे शत्रू आपल्या मुठीत नसून आपणच शत्रूच्या मुठीत आहोत, असे वास्तव आहे. पुनः पुन्हा असे न होण्यासाठी नियोजनबद्ध कृतिशील पावले टाकल्याशिवाय पर्याय नाही. अतिरेक्यांच्या सुळसुळाटामुळे देशात फिरताना १०० प्रतिशत सुरक्षित आहोत, असे म्हणता येत नाही. नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणे शासनकर्त्यांचे दायित्व आहे. दिवस आणि रात्र वैऱयाची असल्याने या स्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे अपरिहार्य ठरते. गुप्तचर यंत्रणा वगळता अन्य कोणाच्याही सूचनेवर कितपत विश्वास ठेवायचा यावर विचार झाला पाहिजे. यासाठी देशाच्या गृहविभागाने घटनांचा अभ्यास करून आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवावी. दुसरा मुद्दा असा की या प्रकारच्या सूचना जेव्हा मिळतात आणि त्यांतील दावे खोटे असल्याचे सिद्ध होते, तेव्हा त्या देणाऱयांवर काय कारवाई केली पाहिजे याचाही विचार होणे गरजेचे आहे. हैदराबाद प्रकरणाने याची अत्यावश्यकता अधोरेखित होते. अतिरेक्यांकडून देशाला अनेकवेळा लक्ष्य करण्यात आले आहे; पण त्यापासून आपण बोध घेतला आहे का, असा प्रश्न पडतो. अमेरिकेसारखे प्रगत देश सुरक्षेविषयी पुष्कळ सावधानता बाळगतात.

घातपाताची सूचना मिळाल्यावर सुरक्षाव्यवस्थेला त्याची सत्यता पडताळून बघेपर्यंत थांबणे शक्य नसते. सूचनेप्रमाणे मार्गस्थ होणे एवढेच हाती असते; कारण अनेकांच्या जीवनाचा प्रश्न असल्याने, त्यावेळी हेच उचित असते की शत्रूला संधी न देता नागरिकांचा जीव धोक्यात पडण्यापासून त्यांचे रक्षण करणे. हिंदुस्थान संरक्षण सामर्थ्यात वाढ करण्यासाठी दर वर्षी हजारो कोटींची गुंतवणूक करत असतो. यातून जी शस्त्रं, अस्त्रं आदी युद्धसामुग्री खरेदी करण्यात येते त्याचा वापर अतिरेक्यांचे केंद्रस्थान असलेल्या पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी केल्यास संरक्षण सामर्थ्यावर करण्यात येत असलेली गुंतवणूक सार्थकी लागेल. शासनकर्त्यांकडून देशवासीय हीच अपेक्षा बाळगून आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करायचा असल्यास त्यांना समजेल त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या