राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी विक्रमी अर्ज, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 35 अर्ज

यंदाचे वर्ष ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकसाठी ओळखले गेले. दोन्ही प्रतिष्ठsच्या क्रीडा महोत्सवांत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी संस्मरणीय कामगिरी केली. यामुळे अर्थातच हिंदुस्थानातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. हिंदुस्थानी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद या पुरस्कारांसाठी तब्बल 600 अर्ज आले आहेत. हाही एक रेकॉर्ड झाला आहे. गेल्या वर्षी जवळपास 400 अर्ज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी आले होते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची सूत्रे निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे जज मुकुंदकुम शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. मुकुंदकुम शर्मा यांच्या नेतृत्वात ही समिती अर्जांची छाननी करीत आहे. लवकरच अंतिम यादीची घोषणा करण्यात येईल. यंदा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी तब्बल 35 अर्ज दाखल झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या पुरस्कारासाठी दोन खेळाडूंनाच प्राधान्य देण्यात येते. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी जास्तीत जास्त 15 खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येते. या पुरस्कारासाठी यंदा 215 अर्ज दाखल झाले आहेत.

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शंभरपेक्षा जास्त अर्ज करण्यात आले आहेत. द्रोणाचार्य पुरस्काराच्या सर्वसाधारण गटासाठी 48 जणांनी अर्ज केला आहे. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी तब्बल 138 अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासाठीही 36 अर्ज आले आहेत.

नीरजसह पाच पॅरालिम्पियनना मिळणार खेलरत्न

ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱया खेळाडूंना थेट खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयही यासाठी आग्रही आहे. निवड समितीलाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱया नीरज चोप्रासह पॅरालिम्पिकमध्ये पाच सुवर्ण पदके जिंकणाऱया हिंदुस्थानी खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार हे निश्चित आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखरा, सुमीत अंतील, मनीष नरवाल, प्रमोद भगत व कृष्णा नागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या