पालघरच्या पोलीस अधीक्षक पुत्राचा सुवर्णवेध, 18 वर्षीय रुद्रांशने नेमबाजीत फडकावला महाराष्ट्राचा झेंडा

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱया रुद्रांश पाटीलने सुवर्ण पदक पटकावले आहे. नेमबाज रुद्रांश पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सुपुत्र आहे.

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुटा व ऐश्वर्य प्रताप तोमर या ऑलिम्पियन नेमबाजांवर मात करून 18 वर्षीय रुद्रांश पाटील याने महाराष्ट्राच्या खात्यात सुवर्ण पदक जमा केले. अवघ्या 18 वर्षे वयाचा रुद्रांश हा ठाणेकर असून आज देशात सगळय़ांच्याच मनावर क्रिकेटचे गारुड असताना त्याने वेगळय़ा वाटेने जाण्याचे धाडस करून यश संपादन केले आहे. नेमबाजीसारख्या क्रीडा प्रकारात सामील होत रुद्रांशने महाराष्ट्राला सुवर्ण पदक पटकावून देत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रुद्रांशचे वडील बाळासाहेब पाटील हे हिंदुस्थानी पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे पालघर पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार आहे तर आई हेमांगिनी पाटील या राज्य परिवहन विभागात नवी मुंबई येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आयएएसएस कनिष्ठ विश्वचषक नेमबाजीत देशाचे प्रतिनिधित्व करताना रुद्रांशने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली होती.