सलमान खानला ‘दंबगगिरी’ महागात पडण्याची शक्यता; गोव्यात बंदी घालण्याची मागणी

2028

अभिनेता सलमान खानला गोवा विमानतळावर रागाच्या भरात त्याच्या चाहत्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी बिंग ह्यूमन सलमानला चांगलेच फटकारले होते. त्याचे हे वागणे आता त्याला महागात पडू शकते गोव्यातील नॅशनल स्टूडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेने त्याच्यावर गोव्यात बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सलमानचा राधे या चित्रपटाच्या चित्रिकरणातही अडचणी येऊ शकतात.

नॅशनल स्टूडंट यूनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ‘ सलमान खानने एका चाहत्याचा अपमान केला आहे. त्याने याप्रकरणी माफी मागितली पाहिजे. त्यामुळे सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे व त्याच्या या वर्तणूकीसाठी त्याला गोव्यात बंदी घालावी’ अशी मागणी अहराज मुल्ला यांनी केली.

तसेच नॅशनल स्टूडेंट यूनियन ऑफ इंडिया व्यतिरिक्त माजी खासदार आणि गोवा राज्याचे भाजप सचिव नरेंद्र सावईकर यांनीही ट्विटरवर सलमान खानवर टीका केली आहे. ‘तुम्ही सेलिब्रिटी असल्याने लोक आणि चाहते तुमच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणार. तुमची गोवा विमानतळावरील वर्तवणूक खूप वाईट होती. यासाठी आपण माफी मागितली पाहिजे.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या