नागपूरात राष्ट्रीय मतदान दिवस साजरा

146

सामना ऑनलाईन । नागपूर

लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांनी सक्रीयपणे सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावतांनाच जनतेच्या सहमतीचे सरकार निवडतांनाच लोकशाही परंपरा संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित  राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सातव्या राष्ट्रीय मतदार दिन समारंभात युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. युवकच देशाचे खरे आयकॉन आहेत. देशाच्य उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.  यावेळी नव तरुण मतदारांचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी फोटो असलेले मतदार ओळखपत्र देवून युवक व युवतींचा गौरव करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक सेवक डॉ. विकास आमटे, कुलगुरु डॉ. सिद्धार्थ  विनायक काणे, ज्येष्ठ गांधीवादी विचारक श्रीमती विभा गुप्ता, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य, तरुण उद्योजक हसन शफीक, प्रशासकीय अधिकारी अमन मित्तल, सुप्रसिद्ध सर्जन स्कीन बँकेचे संस्थापक डॉ. समीर जहागरीदार, आंतरराष्ट्रीय बॅटमिंटनपटू अरुंधती पानतावणे, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू मल्लिका भांडारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

युवकांना मार्गदर्शन करतांना मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार म्हणाले की, वंश, जात, धर्म, पंथ यांचे बंधन न ठेवता सर्वांना मतदानाचा अधिकार घटनेने दिला आहे. या प्रक्रियेमधून सक्षम नेतृत्व निवडण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या अधिकार आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून मतदान करावे, मतदानाकरिता आपले नातेवाईक, मित्रांना प्रोत्साहित करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हातभार लावावा, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जगातील लोकशाही परंपरेसंदर्भात  विविध देशांमधील लोकशाही असलेल्या जगातील इतर देशातील मतदानासंदर्भात माहिती दिली.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे म्हणाले,  बुलेटपेक्षा बॅलेटचे महत्त्व अधिक आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये बुलेटच्या जोरावरती सर्वसामान्य मतापासून वंचित ठेवल्या जात. आपण त्यांना बॅलेटच्या माध्यमातून योग्य उत्तर देऊ शकतो. कुष्ठरोग्यांनाही मतदानाचा अधिकार मिळायला हवा. केवळ हाताची बोटे नाहीत म्हणून त्यांचा अधिकार डावलल्या जावू नयेत.  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदानाचे महत्त्व विशद करतांना श्रीमती विभा गुप्ता म्हणाल्या , तरुणांकडे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असून देखील मतदानाचा हक्क बजावण्याबाबत उदासीनता असते. तरुणांनी ही उदासीनता दूर करुन आपले अस्तित्व सिद्ध करुन दाखविणारच हा ध्यास मनात बाळगायला हवा. तरुणांनी समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत मतदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यानी केले.

कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले , महात्मा गांधीजींच्या विचारातील रामराज्यसाठी तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. नवीन मतदारांनी आपला अधिकार आणि जबाबदारीचे भान ठेवून मतदानाच्या पवित्र कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या वतीने मतदार जागृती मोहीम राबविण्यात आली होती. विद्यापीठ मैदानापासून जागृती रॅली काढण्यात आली. यात २५ महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी निवडणूक प्रक्रिया व लोकशाहीसंदर्भात शाळा, महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्ट्रीट प्ले (पथनाट्य), बेस्ट कॉलेज अवार्ड अशा विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या