नियोजित कोल्हापूर-घोडगे सोनवडे घाट मार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता; शिवसेनेचे यश

222

सामना प्रतिनिधी । कुडाळ

केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत नियोजित कोल्हापूर-घोडगे सोनवडे घाट मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व आमदार प्रकाश आंबीटकर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या घाटमार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे अशी माहीती जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते तथा जि.प.सदस्य नागेंद्र परब यांनी दिली.

शिवसेना सचिव तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक व आमदार प्रकाश आंबीटकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आग्रही भूमिकेमुळे अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला घोडगे-सोनवडे घाट मार्ग आता पूर्णत्वाकडे जात आहे. दोनच दिवसापूर्वी खा.विनायक राऊत यांच्या विनंतीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय तत्परतेने व आपल्या कार्यकूशल पद्धतीने मंत्रालय येथे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत या घाट मार्गासाठी तातडीने पाठपुरावा करून सर्व शासकिय प्रक्रीया पूर्ण करून सदर काम लवकर सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. व त्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या आत केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घाट मार्गाबाबत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक घेऊन त्यास मान्यता दिली. त्यामुळे घोडगे-सोनवडे घाट मार्गाच्या कामातील अडथळ्याच्या शर्यतीतील शेवटचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे. याचे श्रेय सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार विनायक राऊत यांना जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने घोडगे सोनवडे घाट मार्गाचे पाहिलेले स्वप्न खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून व लोकाभिमुख असलेल्या शिवसेना-भाजपा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची तातडीने भेट घेऊन या घाट मार्गाला मान्यता मिळवून दिल्याबद्दल सिंधुदुर्गवासियांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले अशी माहीती जिल्हा परिषदेचे शिवसेना गटनेते तथा जि. प. सदस्य नागेंद्र परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

आपली प्रतिक्रिया द्या