अब रण होगा! शहांच्या रोड शोमध्ये राडा झाल्यानंतर बंगालमृधील योगींची सभा रद्द

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोमध्ये राडा झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द करण्यात आली आहे. बुधवारी कोलकाताच्या फूल बागान भागामध्ये योगींची सभाहोणार होती, परंतु अखेरच्या क्षणी ती रद्द करण्यात आली. भाजपने प. बंगालमधील सत्ताधारी तृणमूलवर सभा रद्द केल्याचा आरोप केला आहे.

भाजपचे नेते राहुल सिन्हा यांनी सांगितले की, योगींच्या महासभेसाठी मंच तयार करण्यात आला होता. यादरम्यान मंच तयार करणाऱ्या मजुरांना मारहाण करण्यात आली, त्यांना धमकी देण्यात आली आणि मंचाची तोडफोड करण्यात आली. बुधवारी दुपारी 2 वाजता येथे सभा होणार होती, परंतु मंचाची तोडफोड करण्यात आल्याने योगींची सभा रद्द करण्यात आली.

योगींचे ट्वीटरास्त्र

योगी आदित्यनाथ यांनी एक ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. योगींनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. भाजपची भीती वाटल्याने बंगालमध्ये सभेसाठी उभारलेले मंच तोडण्यात आले, मजुरांना मारहाण झाली. रॅली रद्द करून ममता बॅनर्जी बंगालला काय बनवू इच्छितात? असा सवाल योगींनी केला आहे. बंगाल हे हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे असेही ते म्हणाले. तसेच अब रण होगा! असेही त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच दुर्गापूजा आणि मोहरमवरूनही त्यांनी ममतादीदींचे कान टोचले

तीन रॅली होणार होत्या
बंगालमध्ये बुधवारी योगी आदित्यनाथ यांच्या तीन रॅली होणार होत्या. त्यापैकी एक रद्द करण्यात आली. आता योगी आदित्यनाथ हावडा आणि केएफआरमध्ये सभा घेणार आहेत. बंगालमध्ये 19 मे रोजी 9 मतदारसंघात मतदान होणार आहे.