‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही – व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रभक्तीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले आहे. ‘जय हिंद’ म्हणजे प्रत्येक हिंदुस्थानींचा जय होणे, असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक हिंदुस्थानींचा विचार करणे आणि त्यांची काळजी घेतल्याने प्रत्येक हिंदुस्थानींचा जय शक्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रत्येक नागरिकाला गरजेइतके पोटभर अन्न मिळणे, कपडे आणि निवारा मिळणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. देशात कोणताही भेदभाव असता कामा नये, असेही नायडू म्हणाले. फक्त राजकीय बंधनातून मुक्ती एवढाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्याचा उद्देश नव्हता. संपत्तीचा समान अधिकार प्रत्येकाला हवा, असे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होते. देशात कोणताही भेदभाव आणि सामाजिक बंधने नसावीत. सांप्रदायिक आणि धार्मिक असहिष्णुता संपुष्टात यावी. प्रत्येक धर्माचा सन्मान करत प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे, असे स्वातंत्र्य त्यांना हवे होते.

राष्ट्र म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाहीत. राष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे उत्थान म्हणजेच राष्ट्रवाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपली संस्कृती आणि परंपरा जगासमोर एक आदर्श आहेत. परस्परांची काळजी घेत विकास साधणे, ही आपली संस्कृती आहे. ‘हे जग आपले कुटुंब आहे’ ही शिकवण आपल्याला पूर्वजांनी दिली आहे. त्याचे पालन केल्यास देशासह जगाचा विकास होईल आणि शांतता नांदेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तेलंगणातील हैदराबादमध्ये मनुष्यबळ विकास संस्थेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यंकय्या नायडू बोलत होते. एखाद्या महान व्यक्तीचा मृत्यू होतो. मात्र, त्याचे विचार हजारो नागरिकांमध्ये जिवंत राहतात. हाच त्यांचा विजय असतो. नेताजी अशा महान व्यक्तीमत्त्वांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी विनम्र अभिवादन करत असल्याचे नायडू म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या