राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात एप्रिल फुल आंदोलन

केंद्र सरकारच्या वतीने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ जनतेला एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत आज नाशिक शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे व युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृवाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विकास आणि रोजगाराच्या घोषणा म्हणजे निव्वळ एप्रिल फुल अशी टीका युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज 1 एप्रिलचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत 1 एप्रिल निमित्त फसव्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विकासाच काय झालं ? एप्रिल फुल , रोजगाराच काय झालं ? एप्रिल फुल, दोन कोटी नोकऱ्यांच काय झालं ? एप्रिल फुलच्या घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केवळ आश्वासन देण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र तरुणांना रोजगार मिळाला नाही. महागाईने जनता चांगलीच त्रस्त झाली. शासनाची धोरणे देखील अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन छेडले. – युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे