निसर्ग आणि संक्रात

दीपक केसरकर, वैद्य

संक्रांत किंक्रांत या आहेत पक्क्या जुळ्या बहिणी…
एकमेकांशिवाय करमत नाही ही त्यांची खरी कहाणी
पंचागांवर या दोघींचा असतो मोठा दरारा
यांच्यावरती मांडला जातो वर्षभराचा सारा पसारा
आई ताई सगळ्यांनाच संक्रांतीची खूप ओढ
या सणाने घराघरातील कडू क्षणही होतील गोड
बंध अशा तिळगुळासारखा अतूट अभेद्य आणि मधाळ
चघळावा तेवढा खुलून जाई कटू भावना होई रसाळ

संक्रांत म्हणजे खरं पाहता संक्रमणाचा काळ. म्हणजे वातावरणात निसर्गात होणारे नवनवीन बदल. हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात अशी चाहूल देणारा सण म्हणजे संक्रांत निसर्गात झाडांना पालवी फुटण्याची सुरुवात याच कालावधीत सुरू होते. त्याचे हे संक्रमण म्हणजे ही निसर्गाची संक्रांत. निसर्गाकडून हेच शिकावं. आपल्या सर्वांगीण आयुष्यात नापीक असलेल्या गोष्टींना तेथेच सोडून सुपिक गोष्टीला जागा द्यावी. या सर्वांमुळे नकारात्मक मनाचे संक्रमण हे ऊर्जादायक सुपिक होकारात्मक मनामध्ये होईल तेव्हा साजरी होईल आपल्या मानवजातीची खरी संक्रांत.

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला! असे बोलत समाजातील लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकजण आपल्या मनातील एकमेकांमधला कटूपणा दूर करून माधुर्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात तिळ आणि गूळ यांचाच समावेश संक्रांत सणामध्ये का केला असावा? पूर्वी या सणादरम्यान तिळ बारीक कुटून ती पावडर अंगाला चोळत असत. बाजरीच्या भाकरीवर तीळ टाकून ती खाल्ली जात असे. तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर लावला जात असे. या सगळ्यांचा महत्त्वाचा भाग आहे. हिवाळ्यातील थंडीमुळे गारव्यामुळे शरीराला आलेला कोरडेपणा हा तिळाची पावडर चोळल्याने दूर होतो. त्वचेला एक वेगळीच चकाकी येते. हिवाळ्यात भूक खूप वाढलेली असते. अशा परिस्थितीत शरीराचे पोषण व्हावे म्हणून बाजरीच्या भाकरीवर तीळ टाकून खाल्ली जाते. ती पचल्यामुळे शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते… आणि असेच तीळयुक्त गूळ खाल्ल्यास शरीराला आतून येणारा कोरडेपणा हा तिळाच्या स्नेहाने कमी होतो आणि गूळ हा शरीरातील बळाचे बृहण करतो.

संक्रांतीदरम्यान महिला वर्गाचा हळदीकुंकवाचा समारंभ आणि त्याची तयारी एकापेक्षा एक पाहायला मिळते. हळद, कुंकू हे सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे. खरं तर हा एकमेकींना ‘तुझं सौभाग्य भरभरून वाढू दे’ अशा शुभेच्छा देण्याचा उत्सव आहे. या कुंकवाच्या टिळ्यामुळे स्रियांची शारीरिक व मानसिक स्थिती नियंत्रित राहण्यास मदत मिळते. टिळा लावल्यास या चक्राचे आणि पिटय़ुटरी ग्लॅडवर चांगले परिणाम होतात. त्यामुळे राजस, तामस गोष्टींवर नियंत्रण राहाते. अशी ही आपल्या संक्रांत सणांची म्हणजेच संक्रमण सणांची ओळख… मग चला मोठय़ांचे आशीर्वाद घेऊन झालेल्या चुकांची माफी मागून आणि मोठय़ा मनाने क्षमा करून मनातील कटूपणा दूर करून गोडवा आणूया. तर खऱया अर्थाने संक्रांत साजरी होईल.