पळसाच्या फुलांनी निसर्गात फुलल्या वनज्योती !

सामना ऑनलाईन । संगमेश्वर (जे . डी . पराडकर )

दंवयुक्त धुक्याने रब्बी शेतीला जसा जोर येतो तशीच भाजीपाल्याची लागवडही वेगाने केली जाते . निसर्गतः निर्माण होणाऱ्या या आल्हाददायक वातावरणामुळे विविध प्रकारची वृक्षसंपदा देखिल मोहोरुन जाते . याकाळात विविध रंगांची आणि आकाराची फुलं सुष्टीतील प्रत्येक घटकाचे लक्ष वेधून घेतात . पानं गळून पडल्यावर फुलणारा गिरीपुष्प , हिरव्या वनराईत फुलणारी पळस फुलांची वनज्योत हे नजरेचे पारणे फेडणारे दृष्य म्हणजे जणू निसर्गदेवतेने केलेला साजशृंगारच म्हणावा लागेल . कोकणात सध्या जागोजागी निसर्गाचे असे मनोहारी रुप पाहायला मिळत आहे .

दाट धुकं पडू लागलं की सर्वप्रथम खुरीच्या फुलांनी जाळ्या बहरुन जातात . ही फुलं दिसू लागली की, खुरीची जाळी कोणती हे लक्षात येतं . अत्यंत नाजूक असणारं खुरीचं फुल गंधाला मात्र मन मोहून टाकणारं असतं . कोकणात जागोजागी खुरीच्या जाळ्या फुलांनी आसमंत व्यापून टाकतात . मोठ्या प्रमाणावर आलेली फुलं आपला गंध चहुकडे पसरुन काहीकाळ निसर्गाच्या सिंहासनावर अधिराज्य गाजवतात . खुरी अंतर्धान पावतेय तो पर्यंत गंधारीच्या हिरव्या जाळ्या रंगीबेरंगी फुलांनी बहरुन जातात . गंधारीच्या जाळ्यांचं हे दृष्य म्हणजे जणू निसर्गाची रंगपंचमी वाटावी असे असते . छोट्या आकाराची गोल फुलं गुलाबी , लाल , नारिंगी अशा विविध रंगांमधून आपलं अस्तित्व दाखवत असतात .

आपल्या जाड पानांनी निसर्गराज्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व सिध्द करणारा वृक्षराज पळस , आपल्या तीनही अवस्थेत सर्वांचं लक्ष स्वतःकडे वळविण्यात यशस्वी होतो . औषधी वृक्ष म्हणून आयुर्वेदात स्थान असणाऱ्या पळसाची पानं जाडसर असतात . यामुळे पळस सहज ओळखून येतो . मोठ्या शहरांमध्ये पळसाच्या पानांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते . पळसाच्या पानावर आईस्क्रीम विक्रेते कुल्फी देतात तर , पानवाला यात विडा बांधून देतो . दाट पानांनी वेढलेला हा वृक्ष डिसेंबर अखेर काही दिवसातच निष्पर्ण होतो . एखाद्या स्त्रीचे अलंकार उतरवल्यानंतर तिचं साधेपण जसं लक्ष वेधून घेतं तद्वत पानं गळून गेल्यानंतरही पळस सर्वांचं लक्ष स्वतःकडे वळविण्यात यशस्वी होतो.

पळसाचं हे निष्पर्ण होवून साधं बनणं काही काळासाठी असतं . थोड्याच कालावधीत तांबूस – केशरी फुलांनी पळस नवा साज लेवून एखाद्या सौभाग्यवतीला लाजवेल अशा रूपाने निसर्गराज्यातील आपलं वेगळेपण सर्वांसमोर ठेवतो . पोपटाच्या चोची सारखं असणारं पळसाचं फुल म्हणजे जणू सौभाग्यवतीने नाकात परिधान केलेली नथच ! सुंदर आकाराची आणि मनमोहक रंगाची पळस वृक्षाची फुलं हिरव्या निसर्गात दूर अंतरावरूनही सहज लक्ष वेधून घेतात . कोकणात जागोजागी असे पळस फुलले की , हे दृष्य ‘ रानात फुलली पळसाची वनज्योत ‘ असेच भासते . पळसाची फुलं पक्षांना आणि मधमाशांना आकर्षित करतात . असंख्य पक्षी आणि मधमाशा या फुलांभोवती मध प्राशन करायला रुंजी घालत असतात .

गिरीपुष्प ही शेताच्या जवळपास असणारी वनस्पती औषधी म्हणून ओळखली जाते . याचा पाला शेतात सेंद्रीय खत म्हणून वापरला जातो . यासाठी गिरीपुष्पाची लागवड ही शेताच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर केलेली आढळते मकरसंक्रांतीच्या दरम्याने गिरीपुष्पाची सर्व पानं गळून जातात आणि उरलेल्या दांड्यांना गुच्छाच्या स्वरुपात आकर्षित करणाऱ्या गुलाबी रंगाची फुलं येतात . विशेष म्हणजे ही फुलं खोडाला येतात आणि खोडाचा सर्व भाग व्यापून टाकतात . या वनस्पतीच वर्णन , ‘गळून पडता पानांचा बहर गिरीपुष्पाला येते फुलायची लहर’ , असं केलं जातं .

आपली प्रतिक्रिया द्या