निसर्गायन

गुढीपाडव्याला कडुलिंबाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक गुढीसोबत त्याची डहाळी लागतेच. पूर्वी बहुतेक घराबाहेर एखादे तरी कडुलिंबाचे झाड असायचे. उन्हाळ्यात त्याच्या सावलीत दुपारचे बसले तर उन्हाची झळ लागायची नाही. आज उंच बिल्डिंगच्या आजूबाजूला झाडे अगदी तुरळक दिसतात. पण त्याबाबतीत मी अजून तरी खूपच लकी आहे. माझ्या घराशेजारी कडुलिंबाचे, आंब्याचे झाड आहे. त्यामुळे सकाळ होते ती या झाडावर बसलेल्या पक्षांच्या किलबिलाटाने. आंब्यावर बसलेली कोकिळा भर उन्हात ओरडते तेव्हा उन्हाळा आल्याची जाणीव होते.

गुढीपाडव्याला कडुलिंबासोबत आंब्याची पाने आणि झेंडूची फुलेदेखील अत्यावश्यक. या सर्व झाडांचे वेगळेच उपयोग आणि गुणधर्म आहेत. मात्र कोणतेही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

कडुनिंब

कडुलिंब अक्षरशः अमृत आहे. याची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून दररोज ते पाणी अंगावर घेतले तर इसब आणि कोरडय़ा त्वचेच्या विकारांवर आराम मिळतो.

ज्याना पित्ताचा त्रास आहे त्यांनी कडुलिंबाचा चहा प्यायल्यास तो त्रास बऱयाच अंशी कमी होतो.

पूर्वी कडुलिंबाच्या काडीने दात घासले जायचे. त्याची फांदी अथवा सालीचा उपयोग दातांच्या आरोग्यासाठी केला जातो. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास तोंडाचा वास कमी होतो.

कडुलिंबाचा चहा किंवा त्याच्या अर्काचा उपयोग रक्तशुद्धीसाठी केला जातो.

कडुलिंबाची पाने खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्ग दोषदेखील कमी होतात.

कडुलिंबाच्या पाला जाळला तर डास कमी होतात.

निंबोणीच्या तेलाने मालीश केल्यास त्वचा तुकतुकीत राहते आणि त्वचाविकार होता नाहीत.

निंबोणीचे चूर्ण कोंबट पाण्यासोबत घेतल्यास पोट साफ राहायला मदत होते.

कडुलिंबाची पाने कपडय़ात ठेवल्यास कोणतेही कीड लागत नाही

कडुलिंबाच्या फुलाने कफ बारा होतो.

चरक आणि सुश्रुत संहितेतदेखील कडुलिंबाचा उल्लेख आढळतो, तर पुराणात समुद्रमंथनात इंद्राने कलशातील अमृत या झाडावर सांडले म्हणून याला अमृत म्हणतात.

झेंडू

आपल्या कार्यात झेंडूची पिवळी, केशरी फुले हारात लागतातच, पण या फुलांचेही अनेक उपयोगी गुणधर्म आहेत.

कोरडय़ा त्वचेवर झेंडूची फुले चोळल्यास त्वचेचा रखरखीतपणा कमी होण्यास मदत होते. आज अनेक सौंदर्य प्रसाधनात याचा वापर केला जातो.

त्वचा तेलकट असेल तर झेंडूची फुले गरम पाण्यात घालून ते पाणी चेहऱयाला लावून दहा मिनिटे ठेवावीत.

तोंडातले व्रण आणि अल्सर या विकारांसाठी झेंडूचा चहा उपयोगी पडतो.

झेंडूच्या फुलांत व्हिटामिन-सी असते हे प्रभावी ऍण्टीऑक्सिडंट आहे.

झेंडूच्या फुलांचा चहा नियमित प्यायल्यास सूज कमी होते. ही फुले सांधेदुखीत प्रभावी ठरतात.

झेंडूच्या फुलांच्या पाण्याने डोके धुतल्यास केसातील कोंडा कमी होतो.

झेंडूच्या फुलांपासून नैसर्गिक पिवळा रंग बनविता येतो.

झेंडूच्या पाकळ्यांचा उपयोग स्वयंपाकातदेखील होऊ शकतो.

या गुढीपाडव्याला सगळ्या वस्तू वापरताना त्या नुसत्या वापरायच्या म्हणून न वापरता त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केल्यास ही झाडे नव्याने आपल्या परिसरात लावली जातील.

आंब्याची पाने

उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या रंगाने डवरलेले झाड म्हणजे आंबा. भारतीय संस्कृतीत आंब्याच्या पानांना- डहाळीला महत्त्व आहे. प्रत्येक शुभ प्रसंगात यांना स्थान असतेच. दाराला लावलेले तोरण असो अथवा कार्यात कलशात नारळाच्या खाली लावलेली पाने म्हणजे आंब्याची डहाळी. कोवळी पाने पोपटी जांभळ्या रंगाची असतात. जी जून झाल्यावर गर्द हिरवी होतात. त्याचेदेखील अनेक उपयोग आहेत,

मधुमेहासाठी याचा उपयोग होतो. आंब्याची पाने वाळवून त्याची एक चमचा पूड दररोज खाल्ल्याने किंवा रात्रभर त्याची पाने पाण्यात बुडवून सकाळी ते पाणी प्यायल्यास मधुमेहात साखर नियंत्रणासाठी उपयोग होऊ शकतो.

आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहू शकते.

कोवळी पाने पाण्यात उकळून त्याचा रंग बदलल्यावर ते पाणी प्यायल्यास व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार होतो.

आंब्याच्या पानाचा रस काढून कानात घातल्यास कानाचे दुखणे कमी होते.

भाजलेल्या ठिकाणी आंब्याच्या पानांची राख लावल्यास त्वचेला आराम मिळतो.

आंब्याची पाने रात्री पाण्यात घालून ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास आणि शरीर निरोगी बनण्यास मदत होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या