भांडण सोडवण्यासाठी बोलवावे लागले हेलिकॉप्टर

सामना ऑनलाईन।  नवी दिल्ली
नौदलाच्या ताफ्यातील सांध्यक या जहाजावर ४ नाविकांनी एका अधिकाऱयाला बेदम मारहाण केली.  या अधिकाऱयाच्या सुटकेसाठी मध्ये पडलेल्या इतर कर्मचारयांनाही या नाविकांनी धुतले. यामुळे या अधिकाऱयाच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरमधून अतिरिक्त कर्मचाऱयांची कुमक मागवण्याची नामुष्की नौदलावर ओढवली. दरम्यान या चारही नाविकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.
बंगालच्या खाडीत पारादीपच्या किनाऱयावर गस्तीवर असलेल्या नौदलाच्या सांध्यक या जहाजावर कर्मचाऱयांच्या नेमणूकीचे काम सुरु होते. यावेळी एका अधिकाऱयाने काही नाविकांना सर्वे मोटर बोट जहाजावर ठेवण्याच्या सूचना दिल्या. पण नाविकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या अधिकाऱयाने नाविकांना समज दिली आणि शिक्षा म्हणून सावधानच्या पवित्र्यात उभे राहण्यास सांगितले. पण नाविकांनी अधिकाऱयाच्या सूचना ऐकून न ऐकल्यासारखे केले. यामुळे अधिकच चिडलेल्या अधिकाऱयाने नाविकांना त्यांच्या उद्दामपणाबददल कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर चिडलेल्या नाविकांनी अधिकाऱयाच्या श्रीमुखात लगावली आणि त्यास लाथाबुक्कया मारायला सुरुवात केली. हे बघून इतरही नाविकांना चेव आला आणि त्यांनीही अधिकाऱयास मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर जहाजाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या बचाव पथकाने  डेकवर धाव घेत नाविकांच्या तावडीतून त्या अधिकाऱयाची सुटका करण्याचा प्रयत्न केला . पण अनियंत्रित झालेल्या नाविकांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा पथकाला पाचारण केले. हेलिकॉप्टरमधून आलेल्या सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब नाविकांना ताब्यात घेतले आणि त्या अधिकाऱयाची सुटका केली.
 नौदलाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नौदलात अशा प्रकारचे बेशिस्त वर्तन कदापि खपवून घेतले जाणार  असेही अधिकाऱ्यांनी  म्हटले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या