नवलचंद जैन याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । नांदेड

वीज वितरण कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ जणांकडून ५० लाखांपेक्षा जास्त पैसे उकळणाऱ्या नाशिकच्या नवलचंद जैन याला नांदेडच्या सहाव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एल. गायकवाड यांनी २७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

नांदेडच्या श्रीनगरमध्ये राहणाऱ्या दिगंबर पांचाळ यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात ९ ऑगस्ट रोजी नवलचंद जैन आणि त्याची पत्नी आशा या दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. वीज वितरण कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नवलचंद आणि आशा लोकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीआधारे कारवाई करण्यासाठी पोलीस पथक २ वेळा नाशिकला गेले. मात्र नवलचंद जैन आणि त्याची पत्नी आशा घरी नव्हते. पोलीस कारवाई सुरू असल्याचे कळताच जैन पती-पत्नीने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र जिल्हा न्यायालयाने अर्ज रद्द केला. उच्च न्यायालयाने नवलचंद जैनला पोलिसांसमक्ष हजर होण्याचे आदेश दिले आणि त्यानंतरच पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर विचार होईल असे सांगितले. अखेर नवलचंद २३ नोव्हेंबर रोजी पोलिसांना शरण आला.

आपली प्रतिक्रिया द्या