नवरात्र विशेष: रंगांची दुनिया

लीना टिपणीस, फॅशन डिझायनर

ज्येष्ठांनी नेहमी फिके रंग वापरावेत असा कुठेतरी अलिखित समज आहे. पण रंगांना वयाचे बंधन कधीच नसते. देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने करूया रंगांची उधळण

रंगाची न्यारी दुनिया… मनास प्रसन्नता देणारी… आहे ते वय दहा वर्षांनी कमी करणारी… आपले सौंदर्य वाढवणारी देखणी, आकर्षक रंगसंगती. कालपासून देवीचा उत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव तपश्चर्येसोबत स्त्र्ााrसुलभ सौंदर्याचाही आहे. हौसेमौजेचा आहे. अगदी मनोरंजनाचाही आहे.

सर्वसाधारणपणे वाढत्या वयानुरूप परिपक्वतेची अपेक्षा धरली जाते. त्यात काही चूक नाही..आणि ही परिपक्वता ओढून ताणून आणावी लागत नाही…तर ती आपसुकच येते आणि त्याची सुरुवात अर्थातच कपडय़ांपासून केली जाते. साधे, फिक्या रंगाचे कपडे आपले आजी-आजोबा प्राधान्याने वापरतात. पण बऱयाचदा या फिक्या रंगाचा अतिरेक होतो आणि उगीचच आपल्या भवतीचं वातावरणही फिकं होऊ लागतं. पण देवीने आपल्या उत्सवाच्या निमित्ताने आपलं जग अधिक रंगीबेरंगी करण्याची छान संधी दिली आहे. तेव्हा चला रंगांच्या दुनियेत.

पांढरा रंग

पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. फॅशनच्या दुनियेत या रंगाला खूप महत्त्व आहे. पूर्वी उन्हाळ्यात या रंगाचे कपडे जास्त वापरले जात होते पण काळानुसार या रंगाला महत्त्व आले. हा रंग कुठल्याही रंगात एकरूप होणारा आहे. त्यामुळे महिलांनी देखील या रंगाला पसंती दिली आहे. पांढऱया रंगांची जिन्स ही प्रत्येक महिलेच्या वॉडरोबमध्ये असायलाच हवी. हा रंग असा आहे की त्यावर सगळ्या रंगांचे टॉप सुंदर दिसतात.

लाल रंग

लाल हा प्रामुख्याने प्रेमाशी निगडित रंग आहे. अनेक महिलांना लाल रंग विशेष आवडतो आणि या रंगात वेस्टर्न गाऊन अप्रतिम दिसतात. वेस्टर्न फॅशनमध्ये लाल रंग प्रसिद्ध आहे त्याला वॅलेंटिनो रेड बोलले जाते. हा प्रतिष्ठत रंग म्हणून फॅशनमध्ये मानला जातो. एवढेच नाही रोजच्या मेकअपमध्ये लाल रंगाला अधिक पसंती दिली जाते.

जांभळा रंग

जांभळा रंग सौंदर्य, पावित्र्य, समृद्धी, विशालता दर्शवणारा आहे. राजेशाही थाट असणारा हा रंग गर्दीत पण उठून दिसतो. फॅशनच्या दुनियेत खूप प्रसिद्ध रंग आहे. हा रंग मॅक्सी गाऊनमध्ये उठून दिसतो.

पिवळा रंग

पिवळा रंग हा शुभ रंग म्हणून ओळखला जातो. या रंगाची अलीकडे क्रेझ वाढली आहे. त्यामुळे नववारी परिधान करणाऱया महिलांची पिवळ्या रंगाला अधिक पसंती आहे. एवढेच नाही तर या रंगाची क्रेझ घागरा-चोलीसाठी पण तेवढीच आहे. व्हाईट अंकल लेन्थच्या ट्राऊजरवर पिवळ्या रंगाचा टॉप शोभून दिसतो.

राखाडी रंग

राखाडी रंग हा वेस्टर्न युरोपीयनमध्ये काळा रंग मानला जातो. जसे आपण हिंदुस्थानी फॅशनमध्ये काळ्याला काळा रंग बोलतो पण तिथे राखाडी रंगाला काळा रंग मानला जातो. राखाडी हा न्युट्रल रंग आहे म्हणजे राखाडी रंगासोबत कोणताही रंग शोभून दिसतो. राखाडी रंगाची कुर्ती असेल तर त्याखाली आपण निळा, लाल, भगवा अशा रंगाचे कोणत्याही प्रकारचे पटियाला सलवार घालू शकतो किंवा गडद रंग घालू शकतो ते उठून दिसतात. तसेच घागरा घालू शकतो.

केशरी रंग

केशरी रंगामध्ये ऊर्जा असते. प्रखरतेचे दर्शन या रंगातून होते. तसेच हा रंग धार्मिकतेचा मानला जातो. धार्मिक जनजागृतीसाठी हा रंग वापरला जातो. अलीकडे हा रंग फॅशनमध्ये आला आहे. या रंगाला एक वेगळे महत्त्व आहे. फॅशनमध्ये केशरी रंग सणांमध्ये पाहायला मिळतो. अलीकडे  या रंगाला ‘फेस्टिव्ह कलर’ म्हणूनही बोलले जाते. महिला लेहेंगा-चोली खरेदी करताना केशरी रंगाला पसंती देत आहेत. तोच तोच रंग नको असलेल्या महिला भगव्या रंगाकडे वळल्या आहेत. केशरी स्लिव्हलेस टँक टॉप पण घालता येतो. सफेद रंगाच्या टॉपवर केशरी रंगाचा स्कार्प छान उठून दिसतो आणि स्टायलिस्ट पण वाटतं.

हिरवा रंग

हिरवा रंग हा निसर्गाचा, समृद्धीचा मानला जातो. हा रंग गोऱया आणि सावळ्या रंगाच्या त्वचेला शोभून दिसतो. पूर्ण हिरव्या रंगाचा पूर्ण पोषाख चांगला वाटत नाही. साडी अपवाद आहे. हिरव्या रंगाची महाराष्ट्रीयन पैठणी साडी शोभून दिसते. सिल्कच्या कडिअल साडय़ा किंवा येवल्याच्या पैठण्या या रंगात मस्त वाटतात. तसेच गडवाल साडय़ा पण छान वाटतात.

गुलाबी रंग

हा लोकप्रिय रंग असून कोमलतेचे प्रतीक आहे. प्रेमाचा-जिव्हाळ्याचा हा रंग आहे.  फॅशन जगतात गुलाबी रंगाला विशेष स्थान आहे. महिलांच्या ड्रेसिंगमध्ये आता गुलाबी रंग जागा घेतोय. हा ग्लॅमरस रंग आहे. या रंगाची घागरा चोली, साडी चांगली वाटते. तसेच या रंगाच्या साडीवर विलंभी, पोलकी बरोबर मोती घालायचे.

निळा रंग

हा रंग असा आहे जो कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला चांगला दिसतो. म्हणजे असे काही नाही हा रंग गोऱया व्यक्तीनेच घालायला हवा. हा रंग सगळ्यांना चांगला दिसतो. हा जगविख्यात रंग आहे. निळा रंग हिंदुस्थानी शराऱयासाठी खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे शिफॉन आणि जॉर्जेटच्या कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांमध्ये हा रंग शोभून दिसतो. या रंगाने व्यक्तिमत्त्व सगळ्यांपेक्षा वेगळे वाटते. या रंगामध्ये मॅक्सी गाऊन, स्किन टाईट कपडे, ऑफ शोल्डर टॉप हे खूप छान वाटतात.