स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव

वृषाली पंढरी

आश्वीन शुद्ध प्रतिपदेला सालाबाद प्रमाणे भक्तिमय वातावरणात सर्वत्र घटस्थापना झाली आहे. गेल्या दोन वर्षांसारखे यंदा कोरोनाचे संकट नसल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सवही धूमधडाक्यात साजरा होणार आहे. चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गादेवीच्या विविध स्वरूपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण, भजन आणि उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम मानला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्री साजऱया केल्या जातात. पैकी दोन नवरात्री गुप्त पद्धतीने केल्या जातात. मात्र, दोन मोठय़ा प्रमाणावर साज केल्या जातात. त्यापैकी एक अत्याधिक महत्त्व असलेले नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र.

नवरात्रीतीत दुर्गेची पूजा ही ‘निर्मिती शक्ती’ची पूजा असते. नवरात्रीतील घटाला सृष्टीचे रूप मानले जाते. या काळात कन्यापूजन करून देवीच्या रूपाची पूजाही केली जाते. भाद्रपद महिन्यातील दुसरा पंधरवडा पितृपक्ष म्ह्णजे पूर्वजांना स्मरण करून वंदन करण्याचे दिवस, पण हा काळ शुभकार्यासाठी अपवित्र मानला जात असल्याने नवीन संकल्प, शुभकार्ये या काळात कुणीही, विशेषतः सनातन धर्मीय करीत नाहीत. प्रचंड ऊर्जा, उत्साह, उमेद देणारा आणि वाईटावर चांगल्याचा विजय असा संदेश देणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे हिंदुस्थानीयांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असला तरी गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दक्षिण हिंदुस्थानातील कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अत्यंत श्रद्धा, भक्ती तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. ‘बृहत्संहिते’नुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱया परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते. घटस्थापना करताना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्वराकडून आकर्षित झालेली शक्ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्र्ापूजेच्या वेळी मिळते अशी समजूत आहे. घरगुती शारदीय उत्सव हा महाराष्ट्र व पश्चिम बंगालमधील मोठा उत्सव असून त्याला सार्वजनिक स्वरूप, विशेषतः महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षांत आले आहे. स्थापनेच्या दिवशी मोठय़ा मिरवणुका काढण्याची पद्धत रूढ झाली आहे.

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायुमंडल शक्ती तत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेज तत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते. म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला ‘देवी’ असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवडय़ांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक सुंदर भारुड रचले आहे –

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासुरमर्दना लागुनी
त्रिविध तापांची कराया झाडणी
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी।।
आईचा जोगवा जोगवा मागेन
द्वैत सारुनी माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा घेईन
भेदरहित वारिसी जाईन।।
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा
करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ सासऱया सांडीन कुपात्रा।।

या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.