नवी मुंबई विमानतळ परिसरातील मच्छीमारांचे पुनर्वसन करा

507
navi-mumbai-airport

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असून या भागातील मच्छीमारांच्या उपजीविकेसाठी त्यांचे पुर्नवसन होण्याची गरज आहे. मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी सर्व्हे करावा असे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांना दिले. मच्छीमार बांधवांचे योग्य पुनर्वसन सिडकोने करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती. सिडकोमध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्यात आला आहे. विविध आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीने ते काम करत असून त्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आदी मागण्यांबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

सिडको प्रकल्पग्रस्त म्हणून काम करणाऱया भूमिपुत्रांना काम करणाऱया कंत्राटदाराने सरकारच्या नियमाप्रमाणे किमान वेतन, सुट्टय़ा, भत्ते, बोनस दिला पाहिजे. यासाठी सर्व कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यामध्ये त्यांना निर्देश द्यावेत असे नगरविकासमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर परिवहन कंपनी बंद पडल्यामुळे जे बेरोजगार झाले आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उलवे, करंजाडे, द्रोणागिरी येथे भूखंड, काही ठिकाणी गाळे उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रकल्पबाधितांना सिडकोने त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ती पावले उचलून त्यांना रोजगाराचीही संधी निर्माण करावी, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सिडको व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, कामगार नेते बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या