एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद; कोरोनाचा रुग्ण आढळल्याने व्यापाऱ्यांचा निर्णय

1915

मुंबई शहर आणि उपनगरांना भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी बैठक घेत बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला एपीएमसीच्या परिसरात ग्राहकांची गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांनी या भागात आता कडक बंदोबस्त ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण आले आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आणि महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी भाजीपाला मार्केटमध्ये दररोज फक्त 200 गाड्यांना परवानगी दिल्यामुळे मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत व्यवहार सुरू आहेत. मात्र, बुधवारी मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यानंतर गुरुवारी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये कांदा-बटाटा मार्केट शनिवारपासून तर भाजीपाला आणि फळ मार्केट शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे आणि संजय पानसरे यांनी सांगितले. या बैठकीत शनिवारपासून भाजी, फळे आणि धान्यासह सर्व मार्केट बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही मार्केट सोमवारपासून बंद ठेवणार होते. पण हा निर्णय आज तातडीने बदलण्यात आला आहे.

धान्य मार्केट सुरू राहणार
कांदा-बटाटा आणि भाजीपाला मार्केटच्या तुलनेने धान्य मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ फार कमी असते. त्यामुळे आम्ही तुर्तास मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमचे मार्केट नियमित सुरू राहणार आहे. ग्राहकांनी मार्केटमध्ये न येता फक्त फोनवरच ऑर्डर द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे धान्य मार्केटचे संचालक निलेश विरा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या