मुख्यमंत्र्यांची ‘लाडका मंत्री’ योजना; नवी मुंबईतील 500कोटींचा भूखंड मंत्री संजय राठोड यांच्या घशात

लाडक्या कंत्राटदारांना पोसणाऱ्या मिंधे सरकारचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील 500 कोटी रुपये किमतीचा मोक्याचा भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके मंत्री संजय राठोड यांच्या घशात घालण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री असणाऱ्या संजय राठोड यांच्या खासगी सचिवाच्या एका पत्रावर नियमबाह्य पद्धतीने राठोड यांच्या संस्थेला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अखिल भारतीय बंजारा सेवा संघ या संस्थेने बंजारा समाजासाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीनुसार राज्य सरकारने सिडकोच्या ताब्यातील 5,600 चौरस मीटरचा भूखंड नोव्हेंबर 2023 मध्ये ‘श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट’ला दिला. मंत्री संजय राठोड या संस्थेचे प्रमुख आहेत. मंत्रीपदावर असलेल्या नेत्याच्या संस्थेला भूखंड कसा काय दिला जाऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

z मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी मंत्र्यांच्या लेटरहेडवर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे 16 जून 2023 रोजी एका पत्राद्वारे बंजारा समाजासाठी भूखंड निश्चित झाल्यानंतर तो श्री संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने वितरीत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्या आधी मंत्री संजय राठोड यांनी सिडकोच्या कार्यालयाला भेट देऊन सिडकोने प्रस्तावित केलेल्या तीन भूखंडांची पाहणी केली. त्यानंतर मंत्र्यांच्या खासगी सचिवाने केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे सदर भूखंड मंत्र्यांची संस्था असलेल्या ट्रस्टला देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

महाराष्ट्राची लूट सुरू आहे

मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री’ असतो तेव्हा काय काय होऊ शकते बघा… तब्बल 500 कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या एक रुपये प्रतिचौरस मीटरच्या किमतीत मिळू शकतो. दुसऱ्यांच्या जमिनी फुकटात हडपू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडका मंत्री’ योजनेचा आणखी एक लाभार्थी महाराष्ट्रापुढे आला आहे.

मतांसाठी लाडक्या बहिणीला 1500/- रुपये आणि लाडक्या मंत्र्याला 500 कोटींचा भूखंड कवडीमोल भावात. महाराष्ट्राची लूट जिथे मिळेल तिथे सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.