ऑक्टोबरमध्ये नवी मुंबईत रंगणार फुटबॉलचा थरार, महिला फिफा विश्वचषकासाठी यजमान शहर सज्ज

17 वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल सामन्यांसाठी यजमान शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई क्रीडानगरी खेळाडू आणि देशविदेशातील पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या विश्वचषकातील पाच सामने नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या सामन्यांच्या दरम्यान फुटबॉलपटूंना सराव करता यावा यासाठी पाच सराव मैदाने महापालिका आणि सिडकोने तयार केली आहेत. या संपूर्ण तयारीचा आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी एका बैठकीत घेऊन सर्वच प्राधिकरणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

हिंदुस्थानमध्ये 17 वर्षांखालील महिला फिफा विश्वचषकाचे आयोजन 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. या विश्वचषकातील 5 सामने नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये 12, 15, 18, 21 व 30 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून करावयाच्या तयारीचा महापालिका आयुक्त बांगर यांनी सविस्तर आढावा घेतला. देशविदेशातील फुटबॉलप्रेमी हे सामने पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने येणार आहेत. त्यामुळे वाहतूक व पार्पिंग व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतूक पोलीस विभागाला दिल्या आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपले नवी मुंबई शहर पुन्हा एकवार आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. म्हणून स्वच्छतेवर विशेष भर देण्यात यावा. विश्वचषकाच्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आदी उपस्थित होते.

फायनल नवी मुंबईमध्येच

महिला फिफा विश्वचषकामध्ये प्रत्येक दिवशी दोन सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी पाच दिवस डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सामने होणारे असून विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझील, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्यूझीलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टांझानिया, क@नडा, फ्रान्स आणि यजमान हिंदुस्थानसह 26 देशांचे संघ सहभागी होणार आहेत.