वाढदिवशीच अल्पवयीन मुलीची छेड काढली, डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

528

तळोजा येथील अल्पवयीन मुलीची तिच्या वाढदिवशीच छेड काढणारे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्यामुळे मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 5 जून 2019 रोजी वाढदिवसाच्या कार्यक्रमात मोरे यांनी सर्वांसमोर या मुलीची छेड काढली होती. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी 26 डिसेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल केला आहे.

तळोजा येथील फेज येथे ही 17 वर्षीय मुलगी राहते. कार्यक्रमाला निमंत्रण नसतानाही निशिकांत मोरे उपस्थित राहिले. तिथे त्यांनी या मुलीचा लैंगिक छळ केला. या प्रकरणाची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे केली. मात्र मोरे बडे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला या तक्रारीची दखल घेतली नाही. मात्र नंतर याप्रकरणी सर्वच स्तरातून दबाव आल्यानंतर तळोजा पोलिसांनी मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांची तीन पथके

निशिकांत मोरे बडे पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी पीडित मुलीला कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे सहा महिने विलंबाने गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी मोरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे ही मुलगी निराश झाली आणि सोमवारी मध्यरात्री सुसाईड नोट लिहून घरातून निघून गेली. या मुलीचा शोध घेण्यासाठी सुमारे 50 पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली असून ते विविध ठिकाणी फिरून मुलीचा शोध घेत आहेत.

उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी मोरे यांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. मात्र अटकपूर्व जामिनावर कोणताही निर्णय न देता न्यायालयाने दोन दिवसांची तारीख दिली. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आता त्यांना अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.

मोरे निलंबित; वाहनचालकाचीही चौकशी सुरू

निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस वाहनाचा चालक दिनकर साळवे याने तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी चौकशी सुरू असून त्यात जे सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. निलंबनाचे आदेश गृह विभागामार्फत काढण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस वाहनचालक हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चालक नसून त्याला जशी नेमणूक असेल त्यानुसार त्या ठिकाणी त्याला नेमले जात असे. मात्र दिनकर साळवे हा संबंधित मुलीच्या घरी कशासाठी गेला? त्याचप्रमाणे त्याचा यामागे नेमका काय हेतू होता? त्याने कुटुंबीयांना धमकावले आहे का? याबाबत चौकशी सुरू असून सत्य समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या