एनएमएमटीचा प्रदूषणमुक्त प्रवास, नवी मुंबईत धावणार 300 इलेक्ट्रिक बसेस

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

शहरातील प्रदूषणाची पातळी घटवण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने 300 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या फम योजनेतून या बसेस उपलब्ध होण्यासाठी लवकरच प्रशासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. नवी मुंबई शहरासाठी यापूर्वी 30 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून त्यापैकी 10 बसेस येत्या महिनाभरात एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

केंद्र सरकारने नवी मुंबई शहरासाठी 30 इलेक्ट्रिक बसेसला मंजुरी दिली. या बसेसपैकी 10 बसेस येत्या महिनाभरात एनएमएमटीच्या ताफ्यात सहभागी व्हाव्यात यासाठी एनएमएमटीचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या 30 इलेक्ट्रिक बसेसच्या धर्तीवर नवी मुंबई शहरासाठी आणखी 300 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी महापालिका आयुक्त रामस्वामी एन. यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदूषणमुक्त प्रवास देणाऱ्या या बसेस खरेदीचा प्रस्ताव तयार करून तो लवकरच केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांमध्ये सध्या 472 बसेस कार्यरत आहेत. या सर्व बसेस सीएनजी आणि डिझेलवर चालतात. आता आणखी 30 इलेक्ट्रिक बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात लवकरच येणार आहेत. सदर बसेस नवी मुंबई शहराला मिळाव्यात यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी विशेष प्रयत्न केले. तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या दालनात अनेक बैठका झाल्या.

कमी भाड्यात एसी प्रवास
शहरात सुरुवातीला येणाऱ्या 30 इलेक्ट्रिक बसेसमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवास थंडगार होणार असला तरी बसेसच्या भाड्यामध्ये जास्त वाढ करण्यात येणार नाही. सर्वसाधारण बसेसपेक्षा थोडे जास्त, पण प्रवाशांना परवडेल इतके भाडे आकारण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या