सिद्धू आमच्या प्रचाराला नको, काँग्रेस नेत्यांची पक्षनेतृत्वाला विनंती

आपल्या विधानांमुळे आणि कृतीमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धू याच्यासाठी काँग्रेसमधली वाट आणखी खडतर होत चालली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि उमेदवारांनी पक्षनेतृत्वाला विनंती केली आहे की सिद्धू यांना आमच्या मतदारसंघात पाठवू नका. सिद्धू हे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या स्टार कँपेनरच्या यादीत सामील होते, तेव्हा त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड मागणी होती. आता परिस्थिती बदलली असून त्यांना प्रचाराला पाठवू नका अशी काँग्रेस नेते, उमेदवार विनंती करायला लागले आहेत.

महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तिथल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सिद्धू यांचेही नाव सामील करण्यात आले आहे. पंजाबसोबतच्या सीमेलगत असणाऱ्या हरयाणातील मतदारसंघांमध्ये शीख मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिद्धू उपयोगी पडतील असं पक्षाला वाटले होते. त्यांच्याप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील स्टार प्रचारकांच्या यादीत सामील आहे. अमरिंदर सिंह यांच्या नावाला काँग्रेस उमेदवारांनी विरोध दर्शवलेला नाही. विरोध हा फक्त नवज्योतसिंह सिद्धू्च्या नावाला होत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्धू यांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन प्रचार केला होता, त्या ठिकाणचे उमेदवार सपाटून हरले होते. हरयाणामधल्याच रोहतकमध्ये सिद्धू यांच्याविरोधात जबरदस्त घोषणाबाजी झाली होती. याच सभेत त्यांच्यावर एका महिलेने चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सत्तेवर आल्यानंतर सिद्धू त्यांना भेटायला खास पाकिस्तानात गेले होते. इम्रान खान यांना मिठी मारत असतानाचे त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. पाकिस्तानसोबत चर्चेतून तोडगा काढावा असं विधान त्यांनी पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केले होतं. त्यामुळे त्यांच्यावर भयंकर टीका झाली होती. सिद्धू जिथे प्रचाराला जातील तिथे विरोधक राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करून आपली अडचण करतील अशी भीती काँग्रेस उमेदवारांना वाटत आहे. ज्यामुळे त्यांनी सिद्धू यांना आमच्या मतदारसंघात प्रचाराला पाठवू नका अशी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या