नवज्योतसिंग सिद्धू परेशान

43
नवज्योत सिंग सिद्धू हे सध्या पंजाबचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आहेत. अनेक वर्ष भाजपमध्ये असलेल्या सिद्धू यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शिरीष कणेकर <<[email protected]>>

नवज्योतसिंग सिद्धूला नवयौवनेप्रमाणे कौमार्य व वैवाहिक जीवन दोन्ही हवेत. कसं शक्य आहे?

त्याच्या मते सहज शक्य आहे. तो पंजाब सरकारमध्ये मंत्री झालाय. त्यानंतरही तो कपिल शर्माच्या ‘कॉमेडी शो’मध्ये भाग घेऊ इच्छितो. तो तिथे फिट्ट बसलाय ही वस्तुस्थिती आहे. तो काय काय मजेशीर बोलतो व प्रेक्षकांना ‘ठोको ताली’ असा आदेश देतो. तेही टाळय़ा पिटून त्याला दाद देतात. सिद्धूचं व कपिलच्या अवघ्या टीमचं चांगलं गूळपीठ जमलंय. इतकंच नाही तर येणारे पाहुणे व पाहुण्याही सिद्धूबरोबर रंगून जातात.

आजवर सगळं सुरळीत चाललं होतं. सिद्धू निवडून आला व अमरिंदर सिंगच्या मंत्रिमंडळात मंत्री झाला. त्यानंतर मात्र सिद्धूच्या ‘कपिल शो’गिरीला जोरदार हरकत घेण्यात आली. ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या मते सिद्धू मंत्री व टी.व्ही. कलाकार दोन्ही एकाच वेळी करू शकत नाही. मंत्रीपद ही चोवीस तासांची नोकरी असून नियमानुसार मंत्र्यांचे पगार व भत्ते सोडून बाहेरून नोकरीचे पैसे मिळवणं त्याला अलाऊड नाही.

सिद्धूचा दावा आहे की संध्याकाळी ७ पासून दुसऱया दिवशी सकाळी ६ पर्यंत तो काय करतो याच्याशी कोणाला देणं घेणं नाही. ‘सुखबीरसिंग बादल यांच्याप्रमाणे मी ट्रान्सपोर्ट कंपनी चालवू का? मनप्रीतसिंग बादल म्हणालेत की, शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत शेती करणारच.’ मग मलाच आडकाठी का करण्यात येतेय? मी माझा पोटापाण्याचा प्रामाणिक व्यवसाय करायचा नाही?’ सिद्धू विचारतो.

मुकुल रोहतगी पुढे म्हणतात, ‘मंत्री म्हणून मिळणाऱया बिदागीव्यतिरिक्त अन्य मार्गांनी पैसे कमावण्यास कायद्याने बंदी आहे. तसं नसेल तर उद्या एखादा न्यायाधीश संध्याकाळनंतर रेस्टॉरंट चालवेल. सिद्धूची सांस्कृतिक मंत्री म्हणून नेमणूक झालेली असल्याने परिस्थिती आणखीच वाईट होते.’

कायद्याची भूमिका स्वच्छ आहे. त्यापुढे सिद्धूचं काही चालेल असं वाटत नाही. काही करून सिद्धूला सांभाळून घ्यायचं असेल तर कायद्यातून पळवाटा शोधून काढल्या जातील. आपल्या देशात कायद्याचे तज्ञ आहेत त्याहून जास्त पळवाटा शोधणारे तज्ञ आहेत. सिद्धूला म्हणावं म्हण ‘ठोको ताली!’

 

आपली प्रतिक्रिया द्या