साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी लेखकावर मोलमजुरीची वेळ

कोरोना महामारीमुळे जगण्याचे संदर्भ बदलून गेले. लाखोंजणांवर बेरोजगारीची कऱ्हाड कोसळली. कोरोनाच्या मृत्यूमुळे जेवढी कुटुंबे उद्ध्वस्त झाली, त्यापेक्षा अधिक कुटुंबे बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त झाली. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या युवा साहित्यकारावरही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. ‘फेसाटी’कार नवनाथ गोरे यांची करुण कहाणी सुन्न करणारी आहे. कोरोनामुळे आयुष्याची दुप्पट फेसाटी झाल्याची उद्वीग्न भावना नवनाथ व्यक्त करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याती निगडी बुद्रुक या गावातून आलेल्या तरुणाला साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे गोरे यांचे नाव संपूर्ण राज्यात चमकले. पण, पोटाचा प्रश्न मात्र सुटला नाही. पदव्युत्तर असणाऱ्या नवनाथ यांनी अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी नोकऱ्याही केल्या. पण, कायमस्वरुपी पोटाचा प्रश्न मिटेल, अशी नोकरी मिळाली नाही. नगर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात ते तासिका बेसिसवर कामाला होते. परंतु, कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि हे महाविद्यालयही बंद झाले. एम.ए, बी.एड. पर्यंत शिक्षण झालेले नवनाथ यांनी सुरुवातीच्या काळात शिवाजी विद्यापीठामध्ये प्रकल्प सहायक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी नोकरीचा शोध घेतला, मात्र त्यांना फारसे कुठे यश आले नाही. आपल्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी त्यांनी ‘फेसाटी’तून मांडली. आणि ही कादंबरी सर्वसामान्यांना आपलीशी वाटू लागली. फेसाटीमुळे नववाथ साहित्यिक म्हणून समाजासमोर आली. या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर झाला. यानंतर छोट्याशा पत्र्याच्या खोलीत पुरस्कारांच्या शिल्डची गर्दी झाली. वर्तमानपत्रे आणि मासिकातून ‘फेसाटी’चे कौतुक झाले, मात्र नवनाथ यांचे आयुष्य बदलले नाही. महाविद्यालय बंद आहे, त्यामुळे उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यांनी गावी शेतीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

पोटाच्या आगीमुळे प्रतिभा वाहून गेली
कोरोनाच्या संकटामुळे कामही मिळणे अवघड झाले. उसनवारीवर खायला धान्य मिळेना, यातच 2-3 दिवस पाण्यावर काढायची वेळ येऊ लागली. पोटाच्या आगीपुढे अंगातील प्रतिभा वाहून गेली. या सहा महिन्यांत आज कुटुंबाला काय खाऊ घालायचे, या विवंचनेत असणाऱ्या नवनाथ यांनी गेल्या 6 महिन्यात हातात पेन धरून एक ओळही लिहिलेली नाही किंवा कोणत्या पुस्तकाचे पानही उगडून पाहिलेले नाही. जगण्याच्या विवंचनेत या कोरोनामुळे आयुष्याची दुप्पट फेसाटी झाल्याचे नवनाथ उद्गविग्नपणे सांगतात.

मोठ्या अपेक्षेने शिकलो, पण अद्याप माझी उपेक्षाच संपलेली नाही. वडिलांचे निधन झाले म्हणून नगरहून गावी आलो, आणि लागलीच लॉकडाऊन लागला. महाविद्यालयही बंद पडले त्यामुळे मिळेल ते काम करून दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्यासाठी धडपडतो आहे. माझ्यासमोर मजुरीशिवाय पर्याय नाही. आई आणि एक अपंग भाऊ असं आमचं तिधांचं कुटुंब आबे. काहीही करून त्यांना जगवण्याचा मी प्रयत्न करतो आङे. दिवसाला दोनशे रुपये मजुरी मिळते, तर कधी तीनशे रुपये मिळतात. यावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो- नवनाथ गोरे

आपली प्रतिक्रिया द्या