चपलांचा हार घालून होळी पेटवल्याने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल संताप

नकारात्मक शक्ती, वाईट प्रवृत्तींचे दहन करून सकारात्मक ऊर्जा देणाऱया पवित्र होळीसमोर हिंदूधर्मिय नतमस्तक होतात. विधीवत पूजा करूनच होळी प्रज्वलित केली जाते. भाजपा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दांपत्याने प्रसिध्दीच्या हव्यासापोटी पवित्र होळीला चपलांचा हार घालून ती पेटवल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

राणा दांपत्य होळीचा सण गेल्या 11 वर्षांपासून मेळघाटातील आदिवासींसोबत साजरा करतात. आदिवासींमध्ये होळीला एक विशेष महत्व आहे. यंदा राणा दांपत्याने होळी पेटवण्यापूर्वी आदिवासींच्या पारंपारिक नृत्यावर ठेकाही धरला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनअधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्या शिवकुमारचा बॅनर यावेळी आदिवासींनी आपल्या होळीवर लावला होता आणि त्याला चपलांचा हार घातला होता. ती होळी राणा दांपत्याने पेटवली.

शिवकुमार याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. परंतु पवित्र होळीला चपलांचा हार घालून हिंदुधर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल राणा दांपत्याचा निषेध व्यक्त होत आहे. केवळ प्रसिध्दीसाठी राणा दांपत्याने हे कृत्य केल्याचा आरोप होत असून त्यांच्यावर कारवाईचीही मागणी जोर धरू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या