महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण व मुळपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास बुधवार दि.3 ऑक्टोबरपासून घटस्थापना होऊन प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगरात भक्तांचा महापूर व हाकेला ओ देणार्या श्री रेणुकादेवीचा गजर भाविक नऊ दिवस करणार असून गडावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
गडावरील श्री रेणुकादेवीच्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी श्री रेणुकादेवी संस्थानच्या विश्वस्त समितीने केली आहे. मंदिर परिसरात रंगरंगोटी विद्युत रोषणाई केळीचे खांब, आंब्याच्या पानांचे तोरण आदी शुभ वस्तूने मंदिर सजविले आहे. प्रशासनातर्फे सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून, 80 सीसीटीव्ही कॅमेर्यांची परिसरावर नजर असणार आहे. सोलापुर येथील स्वराज्य रक्षक सेक्रूटी सर्व्हिसचे 45 प्रशिक्षण घेतलेले सुरक्षारक्षक अतिरिक्त म्हणून बोलावले आहेत. मुख दर्शन दिसण्याकरीता एलसीडी स्क्रीन व 1 वाल बसविण्यात आली आहे. रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर, पदसिद्ध उपाध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सचिव/किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, कोषाध्यक्ष माहूरचे तहसीलदार किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोपी, दुर्गादास भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे बुधवार दि.3 रोजी सकाळी 6 पासून सनई वादन व 7 ते 11.30 दरम्यान मंत्रोच्चारात मुख्य देवता श्री रेणुकामातेच्या महापूजेस प्रारंभ होणार आहे. रेणुकादेवीच्या मुख्य गाभार्यातील घटस्थापना व परिवार देवता तुळजाभवानी, महालक्ष्मीमाता व परशुराम मंदिर परिसरात घटस्थापना होईल व आई रेणुकामातेला पिवळ्या रंगाचे महावस्त्र परिधान करण्यात येईल, अशी माहिती विश्वस्त समितीने दिली आहे.