देशविदेश…उपवास

मीना आंबेरकर

नवरात्रीचे नऊ दिवस उपास… भवानी आईच्या तपश्चर्येचा काळ… उपवास करून आपणही देवीची साधना करूया.

नऊ दिवसांचा हा काळ म्हणजे देवीच्या तपश्चर्येचा काळ. वातावरणात काहीसे गांभीर्य व पावित्र्य असते. आपणही देवीच्या तपश्चर्येत आपला खारीचा वाटा उचलून नऊ दिवस उपवास करण्याचे ठरवतो. पहिले दोन-तीन दिवस साबुदाणा खिचडी, बटाटय़ाचा कीस हे पदार्थ खाऊन आपण तग धरतो, पण त्यात काही वैविध्य न राहिल्यामुळे तो उपवास करणे जड जाऊ लागते. कारण जिभेची चटक आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. कसे काढायचे ठरलेले दिवस, कसा निभवायचा हा उपवास या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण उपासाच्या काही वेगळय़ा रेसिपीज आज बघणार आहोत. बघूया कसं काय जमतंय ते.

puri

राजगिऱयाच्या तिखट पुऱया

साहित्य.. २ वाटय़ा राजगिरा पीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट १ चमचा किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट १ चमचा, १ चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे कोथिंबीर बारीक चिरून.

कृती..राजगिऱयाच्या पिठात मीठ, तिखट व जिऱयाची पावडर, कोथिंबिर असे सर्व घालून अर्धा डाव तेल मोहनासाठी घालून पीठ पाणी घालून बेताचे मळावे. १५ मिनिटांनंतर गोळे करून लाटून पुऱया तळाव्यात. त्याबरोबर नारळाची चटणी किंवा गोड दही द्या.

उपवासाचा उपमा

साहित्य ..२ वाटय़ा वरीचे तांदूळ, अर्धी वाटी भिजलेले शेंगदाणे, २ उकडलेले बटाटे, ७-८ ओल्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, साखर, तूप, फोडणीसाठी जिरे, ओले खोबरे व कोथिंबीर अर्धी वाटी.

प्रथम वरीचे तांदूळ धुवून घ्यावे, तूप-जिरे टाकून फोडणी करावी. फोडणीत मिरच्यांचे तुकडे व भिजवलेले शेंगदाणे टाकावेत. उकडलेल्या बटाटय़ाच्या फोडी करून त्याही फोडणीत घालाव्यात. सर्व पदार्थ व्यवस्थित परतून त्यात आधणाचं पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात वरीचे तांदूळ घालावेत. चवीनुसार मीठ, साखर घालावी. नीट ढवळून चांगली वाफ काढावी. मंद विस्तवावर दोन-तीन वाफांनंतर वरून खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करावा. खाताना वर साजूक तूप किंवा नारळाची चटणी व दही घ्यावे.

वरीच्या तांदळाची खांडवी

साहित्य …१ वाटी वरीचे तांदूळ, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, वेलची पावडर १ चमचा, ओले खोबरे अर्धी वाटी, थोडे तूप.

कृती..वरीचे तांदूळ धुवून घ्यावेत. पातेल्यात तूप टाकून वरीचे तांदूळ त्यात परतून घ्यावेत. १ वाटी पाणी टाकून आंधण घ्यावे. तांदूळ चांगले शिजले की त्यात गूळ घालावा व चांगले परतावेत. चांगले ढवळून घेऊन वाफ काढावी. ताटाला तूप लावून वडय़ा पाडाव्यात. जरा गार झाल्यावर वडय़ा कापाव्यात.

sabudana-vada

उपवासाचे दहीवडे

साहित्य..१ वाटी साबुदाणा,  डावभर पीठ, १ डावभर राजगिरा पीठ, मीठ स्वादानुसार, दही अर्धा लिटर गोडसर ताजे, साखर चवीपुरती, मोहनासाठी तेल १ चमचा. रिफाईंड तेल तळण्यासाठी. आले-मिरची पेस्ट, लाल मिरच्यांचे तुकडे २-४, तूप, जिऱयाची फोडणी, दाणेकूट अर्धी वाटी, कोथिंबीर बारीक चिरून.

कृती..साबुदाणा रात्रीच भिजवावा म्हणजे चांगला भिजतो. साबुदाणा, मीठ, मिरच्यांचे वाटण, वरी पीठ, राजगिरा पीठ, दाणेकूट, थोडी जिरे पूड असे सर्व एकत्र मळून घ्यावे. छोटे छोटे वडे हातावर थापून रिफाइंड तेलात तळून घ्यावेत. एकीकडे दही घुसळून मीठ, आले कीस पावडर, तूप-जिऱयाची फोडणी, लाल मिरच्या घालून तयार करून ठेवावेत. हे तळलेले वडे नुसते कोमट पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढून दह्यात टाकावेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या