‘दुर्गे दुर्घट भारी’चा खरा अधिकार

दादासाहेब येंधे

सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. त्यानिमित्ताने नवरात्रात म्हणावयाच्या आरतीची आठवण झाली. संपूर्ण हिंदुस्थानात नवरात्रात देवीची पूजा-आरती मोठय़ा धूमधडाक्यात केली जाते. एवढेच नव्हे तर बऱयाच जणांच्या घरात लहानसं तरी एखादं देवघर असते. त्यात देव असतात, त्या देवांमध्ये एक देवीची मूर्तीही असते. विवाहविधीनंतर कन्या जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्याबरोबरही एक देवीची मूर्ती देण्याची प्रथाही आपल्याकडे काही ठिकाणी आहे. आपण नवरात्रात नऊ दिवस उपवास करतो. देवीची पूजा करतो, परंतु घरात जन्मलेल्या स्त्राr अपत्याला मात्र नाकारले जाते हे पाहून खूप वाईट वाटते.

आपल्या संस्कृतीमध्ये मुलगा आणि मुलगी हा भेद आपल्या समाजाने कायमच ठेवला आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं, मुलगा आपल्या घराण्याचा वंश वाढवेल, आपल्या कुळाची कीर्ती दूरवर पसरवेल. यासाठी प्रत्येक जण ‘मुलगा’च झाला पाहिजे, असा हट्ट धरतात. मुलगा न झाल्यास त्या महिलेलाच जबाबदार धरतात. काही पुरुष प्रसंगी दुसरे लग्नही करतात. जर मुलगी झाली तर तिच्या लग्नात आपल्याला मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागेल, त्यामुळे मुलाला उच्च व मुलीला दुय्यम स्थान देतात.

जन्म द्यायला आई हवी असते, ओवाळायला बहीण हवी असते, लग्नासाठी बायको हवी असते, मग जन्मास येणारी मुलगीच का नको? हा समाज मुलींची भूणहत्या का करतो? गर्भपात करायला का लावतो? मुलीला या जगात का येऊ देत नाही? या छोटय़ा जिवाचा यात काय दोष असतो?

समाज हा विचार कधीच करीत नाही की, मुलगी झाली तर ती स्वतःबरोबर कुळाचं नाव पुढे नेईल, आई-वडिलांना मदत करील, कुटुंब संस्कारक्षम बनवील, संस्काराचा दिवा दुसऱया कुळातही लावील, पण हा विचार न करताच ‘मुलगा तेवढाच आपला व मुलगी म्हणजे परक्याचे धन, ते कधीच आपलं नसतं, लग्न झालं म्हणजे त्यावरचा आपला अधिकार संपतो’… रूढींनी बनलेला विचार घेऊन समाज पुढे चालला आहे, पण आज विचार केला व आजची वस्तुस्थिती पाहिली तर ज्याप्रमाणे मुलगा कमवतो, त्याप्रमाणेच मुलगीही कमवते. मुलगा आई-वडिलांना सांभाळत नाही, पण मुलगी आई-वडिलांना सांभाळते. हे झाले स्त्राrचे कुटुंबातील स्थान. पण समाजात तिला मुक्तपणे, धीटपणे वावरता येत नाही.

सांगायला फक्त आम्ही स्त्राr-अत्याचाराच्या विरोधात कठोर कारवाई केली, स्त्राr-जीवनात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी अनेक कायदे केले, पण वास्तवात मात्र तिच्या जीवनात आजही अंधकार आहे. स्त्राr-जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी स्त्रियांना साक्षर करण्याबरोबरच त्यांच्यावर घराघरांत, समाजात होणारे अत्याचार दूर केले पाहिजेत आणि हे अत्याचार दूर करण्यासाठी माणसाने स्वतःच्या मनात स्त्रियांविषयी असलेल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे.

त्यासाठी समाजजागृती होणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. गणपती-नवरात्रोत्सव यामध्ये उत्सव-संस्थांनी स्त्राrभ्रूणहत्याविरोधी प्रचार करणे गरजेचे आहे. महिलांनी ही गोष्ट मनावर घेतली तर स्त्राrभ्रूणहत्या होणार नाही. समाजात स्त्राr-पुरुषांचे प्रमाण सारखे राहील.

आई नाहीशी होऊन चालणार नाही. आपण ज्या ग्रहावर राहतो तीदेखील धरणीमाता म्हणून आपण मानतो. समाजातही स्त्राr शिक्षण, स्त्रियांचे आरोग्य याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत योगीने विचारलेला प्रश्न आणि सासुरवाशिणीने त्याला दिलेले उत्तर फार सुंदर रीतीने दिले आहे.

माझं माहेर माहेर

सदा गानं तुइया ओठी

मगं माहेरून आली

सासरले कशासाठी?

सासुरवाशीण

अरे लागे डोहाळे

सांगे शेतातली माटी

गाते माहेरचं गानं

लेक येईल रे पोटी

दे रे दे रे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते

खरोखर, माय सासरी नांदते ते लेकीला माहेर देण्यासाठी! किती हृदयस्पर्शी भावना कवयित्री बहिणाबाईंनी मांडल्या आहेत. म्हणून घरात मुलगी जन्मणे गरजेचे आहे. हीच खरी वंशाचा दिवा म्हणजे ‘वंशिका’ आहे.

आता केवळ मंदिरात किंवा घरात देवीची पूजा करून चालणारा नाही, तर घरातल्या या वावरणाऱया देवीकडे अधिक लक्ष द्यावयास हवे. तिच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे आणि सुखाकडे पाहावयास हवे. तरच आपणांस ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती म्हणण्याचा खरा अधिकार प्राप्त होईल.